...म्हणे सीमाप्रश्न संपला
खासदार इराण्णा कडाडी यांचा जावई शोध
बेळगाव : सीमाप्रश्न संपला असून विकासाच्या मुद्द्यावर मराठी भाषिक राष्ट्रीय पक्षांमध्ये येत आहेत. केवळ राजकारणासाठी भाषेचा मुद्दा उचलला जात असल्याचे मत खासदार इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विधानामुळे सीमाभागात नाराजीची प्रतिक्रिया उमटत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना सीमाप्रश्नाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी खासदार कडाडी यांनी हे उत्तर दिले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने भाषेचे राजकारण करून बेळगाव महानगरपालिका, तसेच बेळगाव, खानापूर, निपाणी येथील आमदारकी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये यश मिळविले होते. परंतु, सध्याची परिस्थिती वेगळी असून मराठी भाषिक राष्ट्रीय पक्षांकडे आल्याचे त्यांनी सांगितल्याने सीमावासियांमध्ये नाराजी पसरली आहे. अजून कितीही वर्षे लागली तरी स्वाभिमानी मराठी भाषिक म. ए. समितीच्या झेंड्याखालीच लढा देत राहतील, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
सीमाप्रश्न दाव्याचा अभ्यास करून बोला...
सीमाप्रश्नासंदर्भात खासदार इराण्णा कडाडी यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्यावर एका महत्त्वाच्या पदाची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नाही. 2004 मध्ये सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दाव्याचा अभ्यास करून त्यांनी बोलावे.
- मालोजी अष्टेकर
बेळगावचा खरा विकास म. ए. समितीची सत्ता असतानाच....
बेळगावचा खरा विकास म. ए. समितीने महानगरपालिकेत सत्ता असताना करून दाखविला आहे. सध्याच्या खासदारांनी बेळगावच्या वाट्याचे अनेक प्रकल्प हुबळी-धारवाडला नेले आहेत. त्यावर प्रथम बोला. कोणत्याही आर्थिक मदतीविना सव्वालाख लोकांनी समितीला मतदान केले, हे खासदार कडाडी यांनी विसरू नये.
- शुभम शेळके