सावंतवाडी संघाची जेतेपदाची हॅट्ट्रीक
लोकमान्य चषक क्रिकेट स्पर्धा : वैभव परब ‘सामनावीर’, मयुर वीर ‘मालिका वीर’ पुरस्कार
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
लोकमान्य को-ऑप सोसायटी आयोजित लोकमान्य प्रिमीयर लीग आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या शनिवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सावंतवाडी संघाने म्हापसा संघाचा 8 गड्यांनी पराभव करुन लोकमान्य चषक पटकावित सलग तीन वर्षे स्पर्धा जिंकण्याचा नवीन विक्रम नोंदविला. अष्टपैलु खेळाडू वैभव परबला ‘सामनावीर’ तर मयुर वीर ‘मालिकावीर’ ने गौरविण्यात आले.
एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव तरुण भारत संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 7 गडी बाद 44 धावा जमविल्या. त्यात हर्षर परबने 16 केल्या. सावंतवाडी संघातर्फे सागर वाईरकरने 12 धावांत 4, गौरव हेर्लेकरने 8 धावांत 2 तर पंकज परबने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना 8 षटकात 2 गडी बाद 45 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात मयुर पिंगुलकरने 1 षटकार 2 चौकारांसह 23, गौरव हेर्लेकरने 18 धावा केल्या. बेळगावतर्फे कर्णधार तन्वीरने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात म्हापसा संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी बाद 130 धावांचा डोंगल उभा केला. त्यात दत्तानंद शेटेने 5 षटकार 3 चौकारांसह 21 चेंडूत 54 धावा करुन अर्धशतक झळकविले. त्याला अनय नाईकने 5 चौकारांसह 26, अक्षय यात्रीकरने 3 चौकारांसह 21 तर मयुरवीरने 11 धावा करुन सुरेख साथ दिली. बेळगाव कार्पोरेटतर्फे सागर पाटीलने 34 धावांत 2, जोतिबा दुनदुनीने, विशाल सावंत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना 10 षटकात 8 गडी बाद 69 धावाच केल्या. त्यात कृष्णा धाडवेने 2 चौकारांसह 19, गणेश कंग्राळकरने 3 चौकारांसह 12 धावा तर संदीप किणेकरने 11 धावा केल्या. म्हापसातर्फे जयेश लाड, मयुरवीर यांनी प्रत्येकी 2 तर योगी, प्रदीप बोकडे व नितेश शेटगावकरने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
अंतिम सामन्यात म्हापसा संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात सर्वगडी बाद 50 धावा केल्या. त्यात गोविंद पालेकरने 1 षटकार 2 चौकारांसह 22, अनय नाईकने 13 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे सागर वाईरकरने 3 धावांत 4, वैभव प्रभूने 11 धावांत 2 तर पंकज प्रभूने 24 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सावंतवाडी संघाने 4.1 षटकात 2 गडी बाद 51 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात सलामवीर वैभव परबने 1 षटकार 3 चौकारांसह 11 चेंडूत 21, पंकज परबने 2 षटकारासह 14 धावा केल्या. म्हापसातर्फे योगी व मयुरवीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन व तरुण भारतचे समुह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, लोकमान्यचे डायरेक्टर गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, पंढरी परब, अजित गरगट्टी, विरसिंग भोसले, अभिजित दिक्षित आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सावंतवाडी व उपविजेत्या म्हापसा संघाला चषक देवून गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यातील सामनावीर वैभव परब, उत्कृष्ठ फलंदाज सुहास रावळ (तरुण भारत-बेळगाव), उकृष्ठ गोलंदाज सागर वाईरकर (सावंतवाडी), उकृष्ठ क्षेत्ररक्षक गौरव हेर्लेकर (सावंतवाडी), शिस्तबद्ध संघ (मुंबई), मालिकावीर मयुरवीर (म्हापसा) यांना चषक देवून गौरविण्यात आले. यास्पर्धेसाठी पंच म्हणून तेजस पवार, जोतिबा पवार, सोमनाथ सोमनाचे, बाबु बासरी, तसेच स्कोरर म्हणून शिवानंद पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे, अभिषेक पालेकर, उमेश मजुकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू नाईक, सतीश गोडसे, राजू दळवी, उमेश कासेकर, भरम कोळी, अरविंद माने, भाऊ कुऱ्हाडे, अमर खनगावकर, गणेश कंग्राळकर यांनी काम पाहिले.