पंकज परब मालिकावीर, गौरव हेर्लेकर सामनावीर, बेळगाव तरुण भारत उपविजेता, जयेश उत्कृष्ट फलंदाज, प्रनील उत्कृष्ट गोलंदाज
बेळगाव : लोकमान्य सोसायटी व तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 11 व्या लोकमान्य चषक लोकमान्य प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सावंतवाडी संघाने बेळगाव तरुण भारतचा 9 गड्यांनी पराभव करुन लोकमान्य प्रिमियर चषक पटकाविला. पंकज परबला (सावंतवाडी) मालिकावीर तर गौरव हेर्लेकरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. युनियन जिमखाना आयोजित लोकमान्य चषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 बाद 83 धावा केल्या. त्याला उत्तर देताना मॅनेजमेंट संघाने 8 षटकात 7 बाद 64 धावाच केल्या. हा सामना मुंबईने 19 धावांनी जिंकला. प्रवीण पावसकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात तरुण भारत बेळगावने कोल्हापूरचा 9 गड्यांनी पराभव केला. कोल्हापूरने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 बाद 55 धावा केल्या. त्याला उत्तर देताना तरुण भारतने 6.1 षटकात 1 बाद 56 धावा केल्या. पुष्पक याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
तिसऱ्या सामन्यात पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 बाद 49 धावा केल्यानंतर सावंतवाडी संघाने 6 षटकात 4 बाद 52 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. अमित याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. चौथ्या सामन्यात बेळगावने 8 षटकात 4 बाद 51 धावा केल्या. त्याला उत्तर देताना म्हापसाने बिनबाद 54 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. जयेशला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या उपांत्य सामन्यात तरुण भारत बेळगावने 8 बाद 64 धावा केल्या. त्याला उत्तर देताना मुंबईने 8 षटकात 4 बाद 54 धावाच केल्या. हा सामना बेळगावने 9 धावांनी जिंकला. बेळगावच्या शुभमला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सावंतवाडीने 8 षटकात 5 बाद 127 धावांचा डोंगर रचला. याला उत्तर देताना म्हापसा संघाने 8 षटकात 9 बाद 62 धावाच केल्या. सावंतवाडीने हा सामना 65 धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. पंकज परबला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
अंतिम सामन्यात बेळगाव तरुण भारतने 6 षटकात 8 बाद 36 धावा केल्या. त्यात कर्णधार तन्वीरने 1 षटकार 2 चौकारांसह 18 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे गौरव हेर्लेकरने 12 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सावंतवाडीने 3.4 षटकात 1 बाद 40 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. वैभवने 1 षटकार 3 चौकारांसह नाबाद 21 तर गौरव हेर्लेकरने नाबाद 14 धावा केल्या. बेळगाव तरुण भारततर्फे तन्वीरने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, पंढरी परब, सीईओ अभिजित दिक्षित, निवृत्त कर्नल दीपक गुरंग, सीएफओ वीरसिंग भोसले, सुनील मुतकेकर, जयेश पाटील, विनायक जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सावंतवाडी व उपविजेत्या तरुण भारत बेळगाव संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर गौरव हेर्लेकर (सावंतवाडी), उत्कृष्ट फलंदाज जयेश (म्हापसा), उत्कृष्ट गोलंदाज प्रनिल पावसकर (मुंबई), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितेश (म्हापसा), उत्कृष्ट यष्टीरक्षक अरुण लठ्ठे (तरुण भारत), मालिकावीर पंकज परब सावंतवाडी यांना चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून तेजस पवार, रोहन पाष्टे तर स्कोरर म्हणून प्रसाद नाडगौडा यांनी काम पाहिले. समालोचन प्रमोद जपे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सतीश गोडसे, राजू दळवी, भाऊ कुराडे, गणेश कंग्राळकर, भरम कोळी, अमर खाणगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
आयोजक समितीचा गौरव
बेळगावमध्ये गेली अनेक वर्षे लोकमान्य चषक क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येते. ही स्पर्धा नीटनेटकेपणाने भरविली जात असून स्थानिक व परगावातील संघांना सर्व सोयीसवलती उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे आयोजक समितीचा खास गौरव करण्यात आला. अशाच पद्धतीने ही स्पर्धा पुढेही आयोजित करावी, असे आवाहन करण्यात आले.