For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: जगीं तारक एक नाम। उत्तम धाम पंढरी।।

03:23 PM Jun 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  जगीं तारक एक नाम। उत्तम धाम पंढरी।।
Advertisement

अभंगामध्ये संत सावता महाराजांनी उत्तम धाम कोणते ते सांगितले आहे

Advertisement

By : ह. भ. प. अभय जगताप 

सासवड : 

Advertisement

जगीं तारक एक नाम ।

उत्तम धाम पंढरी ।।

चला जाऊ तया गावा।

पाहू देवा विठ्ठला ।।

वंदु संत चरण रज ।

तेणे काज आमुचे ।।

सांवता म्हणे विटेवरी ।

उभा सम चरणी हरी ।।

अभंगामध्ये संत सावता महाराजांनी उत्तम धाम कोणते ते सांगितले आहे. विठ्ठल भक्त असणारे सावता महाराज हे पंढरपूर जवळच असलेल्या अरण गावचे रहिवासी. अर्थात पंढरपूरजवळ असूनही त्यांना शेतीमुळे बहुदा नेमाची वारी शक्य होत नव्हती. विहिरीच्या पाण्यावर होणारी त्यांची बागायती शेती होती.

कांदा, मुळा, लसूण, मिरची कोथिंबीर वगैरे पिकांचे उल्लेख त्यांच्या स्वत:च्या अभंगात आहेत. सर्व संतांप्रमाणे त्यांनी आपले काम ईश्वराची भक्ती म्हणून केले. हे करताना त्यांनी आपल्या मळ्यात पांडुरंग पाहिला, त्यामुळे ते कधीच पंढरपूरला गेले नव्हते, असा एक समज प्रचलित आहे.

त्यामुळे सर्व संत क्षेत्रावरून अरणला पालख्या येत असल्या तरी अरणवरून सावता महाराजांची पालखी पंढरपूरला जात नाही. आषाढी एकादशी झाल्यावर वद्य पक्षात सावता महाराजांच्या समाधी उत्सवाला पंढरपूरवरून पांडुरंगाची पालखी जाते. पण त्यांचे विठ्ठल नामाचे व पंढरी वर्णनाचे अभंग उपलब्ध आहेत. त्यावरून ते अजिबात पंढरपूरला गेले नव्हते, असे दिसत नाही.

काम करताना नामस्मरण व जमेल तशी पंढरीची वारी, या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या होत्या, असे दिसते. या अभंगातही त्यांनी पंढरपूरला जाण्याचा निर्देश केला आहे. ते म्हणतात की, सर्वांमध्ये विठ्ठलाचे नाव उत्तम आहे आणि पंढरपूर हे सर्वश्रेष्ठ धाम आहे. तेव्हा आपण त्या गावाला जाऊ आणि विठ्ठल देवाला पाहू. वारकरी संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवला आहे.

त्यामुळे आपल्याला विठ्ठल प्राप्ती होणार आहे म्हणून या मार्गामध्ये संतांना फार महत्त्व आहे. पंढरपूरला अशा संतांची भेट होते. अशा संतांच्या चरणधुळीला आपण वंदन करू, म्हणजे संतांच्या चरणी लीन होऊ. भगवंत प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. पण, त्यातला सोपा, सहज साधला जाणारा, श्रेष्ठ मार्ग आपल्याला संतांनी दाखवला आहे.

त्यांच्यामुळे आपले काज म्हणजे काम साध्य होत आहे. त्यांनीच आपल्याला विटेवर समचरणी उभे असलेले परब्रम्ह दाखवले आहे. अशाप्रकारे या एका अभंगात सावता महाराजांनी विठ्ठलाचे नाम, पंढरपूर धाम, विटेवर उभे असलेले रूप आणि संत या सर्वांचे वर्णन केले आहे.

Advertisement
Tags :

.