Vari Pandharichi 2025: वाचे आळवावा पांडुरंग, सावतोबा म्हणाले, जे तुमच्या ओठी आहे तेच माझ्या पोटी
त्यांनी हा भागवत धर्म, वारकरी संप्रदाय अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवला
By : मारी उत्पात
ताशी : खरे तर पंढरपूरच्या वारीची प्रथा ज्ञानेश्वरांच्या आधीच्या काळापासून होती. विठ्ठल संप्रदाय होता. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यालाच साधे सोपे रूप देत भागवत धर्माची स्थापना केली. समाजातील सर्व लोकांना भक्तीची दारे खुली केली. मग या संप्रदायात सर्व जाती धर्माची माणसे सामील झाली. आणि त्यांनी हा भागवत धर्म, वारकरी संप्रदाय अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवला.
हा संप्रदाय लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण म्हणजे यामध्ये कुठलेही कर्मकांड नाही. आपली दैनंदिन कामे करत आपण विठ्ठल भक्ती करू शकतो. संसारातील कर्मे करत अनेक संतांनी उच्च कोटीची विठ्ठल भक्ती प्राप्त केली. विठ्ठल भावभक्तीचा भुकेला आहे. तो भक्तांसाठी स्वत:ला शिणवतो.
जनाबाईचे दळण दळतो, चोखोबाची गुरे राखतो, श्रीखंड्या होऊन नाथा घरी पाणी भरतो. त्यात त्याला परमानंद होतो. कर्मपूजा करत विठ्ठल भक्ती करणाऱ्या संतांच्या मांदियाळीतील अग्रस्थानी असलेले नाव म्हणजे सावता माळी! केवळ नामसंकीर्तन करत त्यांनी आपली विठ्ठल भक्ती जोपासली होती. त्यांचे वडील पुरसोबा हे वारकरी होते. तेच संस्कार सावतोबांवर झाले होते.
आपला मळा म्हणजे पंढरी आणि त्यात पिकलेली पिके म्हणजे विठ्ठल या श्रद्धेने त्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची उपासना केली. स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात, सावत्याने केला मळा विठ्ठल देखियेला डोळा, अशी त्यांची भूमिका होती. आपल्या दारावरून जाणाऱ्या वारकऱ्यांची ते फळे फुले देऊन सेवा करत.
त्यांना वारकऱ्यांनी विठ्ठल इतक्या जवळ आहे तुम्ही पंढरपूरला का येत नाही? असे विचारल्यावर त्यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे उत्तर दिले. ईश्वराने आपल्याला दिलेले कार्य मनापासून, श्रद्धेने करावे. हीच खरी त्याची सेवा आहे. भक्ती आहे. ईश्वर भेटीसाठी भक्तीभाव हवा.
कर्मकांड नको अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या कर्मप्रधान भक्तीवर विठ्ठल प्रसन्न होता. त्यांना मळ्यातच विठ्ठल दर्शन होत असे. संत कुर्मदासांना भेटायला ज्ञानेश्वर आणि नामदेवांसह विठ्ठल आले असता जाताना वाटेत सावता माळ्याचा मळा लागला. तेव्हा विठ्ठल पळत सुटला आणि सावतोबांना म्हणाला मला कुठेतरी लपव, माझ्या मागे चोर लागलेत.
तेव्हा सावता माळी म्हणाले, देवा अशी कोणती जागा आहे जिथे तू दिसणार नाहीस? तेव्हा विठ्ठल म्हणाला मला तू तुझ्या उदरात लपव, त्यावेळी शेतात काम करत असलेल्या सावतोबांनी हातातल्या खुरप्याने पोट फाडून विठ्ठलाला आपल्या पोटात लपवले. देवाचा शोध घेत ज्ञानेश्वर आणि नामदेव तिथे आले. त्यांनी सावतोबाला आमच्या देवाला पाहिले का? असे विचारले.
सावता माळी काही बोलले नाहीत. नामदेवांनी करूणार्तपणाने विठ्ठलाचा धावा सुरू केला. त्यामुळे विठ्ठल व्याकूळ झाला. त्याने सावतोबाला मला बाहेर काढ असे सांगितले. मग परत खुरप्याने पोट फाडून सावतोबाने विठोबाला बाहेर काढले. सावतोबा ज्ञानेश्वर आणि नामदेवांना म्हणाले जे तुमच्या ओठी आहे तेच माझ्या पोटी आहे.