For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सवितर्क आणि सविचार समाधी

06:09 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
सवितर्क आणि सविचार समाधी
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा म्हणाले, भौतिक इच्छा, अपेक्षा, विषयसेवन इत्यादि गोष्टी असल्या की, मनुष्य आपला योग चांगला आहे असे समजतो पण ह्या गोष्टी कायम टिकणाऱ्या नसल्याने परमार्थ साधण्यासाठी निरुपयोगी आहेत, त्यापासून सावध राहून त्यावर ताबा मिळवावा लागतो. परमार्थ साधण्यासाठी कायम टिकणाऱ्या म्हणजे नित्य गोष्टींची आवश्यकता असते. त्यासाठी योगनिष्ठ होणं आवश्यक आहे. म्हणजे योगमार्ग धरण्याची गरज आहे. ह्यासाठी भगवान पतंजलीमुनींनी योगदर्शन नावाचे शास्त्र विकसित केलेले आहे. योगभूमीचा प्रकाश मनामध्ये प्रकाशित होऊन टिकण्यासाठी योग्याने योगसाधना कशी करावी त्याचे कोणकोणते टप्पे आहेत ते आपण बाप्पांच्याकडून समजून घेऊ. अर्थात हे सर्व सहजसाध्य नसल्याने हळूहळू प्रगती होत जाते हे लक्षात ठेवावे.

यासाठी सर्वप्रथम आपल्या आवडत्या दैवताचे स्मरण करून त्याची आपल्याला आवडणारी मूर्ती डोळ्यापुढे आणावी. ती प्रत्यक्ष आपल्यासमोर हजर आहे अशी कल्पना करून त्याची मानसपूजा करावी. मानसपूजा करून नामस्मरणाला सुरवात करावी. नामस्मरणाने आपल्या दैवताला आपण हाक मारत असतो. अशी हाक मारताना त्या दैवताचे अवतारकार्यातील भव्य स्वरूप नजरेपुढं उभं राहतं व आपोआपच नामस्मरण अधिकच आवडीने केले जातं. जरी जप करण्यास सुचवले असले तरी हे साधण्यासाठी नवविधा भक्तीतील कोणताही प्रकार वापरून आवडत्या दैवताशी अनुसंधान म्हणजे त्या दैवताशी सतत संपर्क ठेवला तरी चालेल. भक्तीचे नऊ प्रकार भागवताच्या पुढील श्लोकात सांगितले आहेत.

Advertisement

श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम् ।

अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।।

अर्थ : श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. या 9 प्रकारांनाच नवविधा भक्ती असे म्हणतात.

अशाप्रकारे ईश्वराच्या संपर्कात सतत असणे ह्यालाच सवितर्क समाधी असे म्हणतात. याला सवितर्क म्हणायचं कारण म्हणजे आपल्या दैवताची मूर्ती अशी असेल, त्याने अमुक अलंकार घातले असतील, अमुक शस्त्रs धारण केली असतील असे अनेक तर्कवितर्क आपण लढवत असतो म्हणून ती सर्व वितर्कांसह साधलेली एकाग्रता म्हणजे समाधी होय. आपल्या आवडत्या दैवताशी सतत संपर्क किंवा अनुसंधान राखण्याचा विचार सतत मनात राहिल्याने इतर विचार आपोआपच बाजूला पडतात. त्यामुळे आपले चित्त सतत त्या विचारात राहिल्याने इतर विषयावर त्याचे चिंतन करणे आपोआप कमीकमी होत जाते. गेली अनेक जन्म आपल्या चित्ताला कोणत्या ना कोणत्या विषयावर चिंतन करण्याची सवय लागलेली असते. ती सवय हळूहळू आटोक्यात येऊ लागते. त्यामुळे आपले चित्त स्वस्थ होत जाऊन शांत होऊ लागते.

असा अभ्यास अनेक वर्षे आदरपूर्वक केल्यावर तो पक्व होतो. मग स्थळ, काळ, आसन, उपकरणे इत्यादि गोष्टी मनात न आणता केवळ आराध्याच्या मूर्तीचा विचार मनात येतो व त्या विचारावर मन स्थिर होते. ही सविचार समाधी होय. यामध्ये जाता, येता, उठता, बसता, काम करत असताना थोडक्यात व्यवसायाकडे जाणारा वेळ सोडून आपल्याकडून उपास्याचे चिंतन घडत असते व सविचार समाधी साधली जाते. असे जरी असले तरी साधकाने रोजच्या ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी नियमितपणे हा अभ्यास चालूच ठेवावा.

ह्या स्थितीपर्यंत कान, नाक, जीभ आदि ज्ञानेंद्रियांमार्फत आनंद घेण्याचे साधकाचे काम चालूच असते. कारण अजून त्याची भोगविषयांची आवड टिकून असते. तो विषयांपासून आनंद मिळवत असल्याने त्याच्या चित्तात रजोगुणी प्रवृत्तीचा मळ म्हणजे त्या इच्छांचे विचार साठून असतात. पण सविचार समाधी परिपक्व होऊ लागली की, चित्त सत्वसंपन्न झाल्याने आनंद वाटू लागतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.