सावगावचा नगरपंचायतीमध्ये समावेश नको
मंडोळी ग्राम पंचायतमध्ये विलीन करा : सावगाव ग्रामस्थांची मागणी : बेनकनहळळी ग्राम पंचायतीला मिळणार नगरपंचायतीचा दर्जा
वार्ताहर/किणये
बेनकनहळळी ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार आहे. सरकारकडून तशा पद्धतीचे नोटिफिकेशन देण्यात आले आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळणे महत्त्वाचे मानले जाते. शहरालगत असलेल्या ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात येऊ लागला आहे. सावगाव हे गाव बेनकनहळळी ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे सावगावही नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होणार आहे. मात्र आम्हाला नगरपंचायतीचा दर्जा नको, अशी मागणी सावगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सावगाव हे गाव मंडोळी ग्राम पंचायतीला जोडण्यात यावे, अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे 5500 लोकवस्तीचे सावगाव हे गाव आहे. या गावातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.
तसेच गाव सर्वसामान्य लोकांचे आहे. काबाडकष्ट, करणाऱ्यांचे आहे. या गावातील सुमारे 350 महिला रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करत असतात. गावातील महिलांसाठी रोजगार हमी योजना हे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. मात्र सावगाव गाव बेनकनहळळी ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे जर हे गावही नगरपंचायतीमध्ये जोडल्यास गावातील महिलावर्गाचे रोजगार हमीचे कामकाज बंद पडणार आहे. याची चिंता सदर लाभार्थी महिलांना लागून राहिली आहे. बेनकनहळळी ग्राम पंचायतमध्ये एकूण 36 ग्राम पंचायत सदस्य आहेत. यामध्ये सावगाव गावात 7 ग्राम पंचायत सदस्य आहेत. बेनकनहळळी ग्राम पंचायतमध्ये बेनकनहळळी, गणेशपूर, ज्योतीनगर व सावगाव या गावांचा समावेश आहे.
बेनकनळळी ग्राम पंचायतमध्ये नगरपंचायतीच्या संदर्भात चर्चा होऊन एखादा ठराव झाला असणार. यावेळी सावगावातील ग्रा.पं. सदस्यांनी सदर प्रस्तावाला विरोध करायला हवा होता, अशी चर्चाही गावात सध्या सुरू आहे. बेनकनहळळी ग्रा.पं.ला नगरपंचायतीचा दर्जा मिळू देत. सरकारचा आदेश असेल तर याला आमची कोणतीही तक्रार नाही. मात्र सावगाव हे सर्वसामान्य लोकवस्तीचे गाव आहे. इथल्या महिलांना रोजगार हवा आहे गावातील नागरिकांचा शेती हाच व्यवसाय आहे. त्यामुळे सावगाव हे गाव मंडोळी ग्रा.पं.ला जोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. यासाठी महिला व ग्रामस्थ यांच्यामध्ये सध्या बैठका सुरू आहेत. सावगावच्या बाजूलाच मंडोळी हे गाव आहे. मंडोळी ग्रा मपंचायतमध्ये मंडोळी व हंगरगा या दोन गावांचा समावेश आहे. या ग्राम पंचायतीमध्ये 15 ग्राम पंचायत सदस्य आहेत.
कायदेशीर लढा उभारावा लागेल
बेनकनहळळी ग्रा.पं.ला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासंदर्भात नोटिफिकेशन आलेले आहे. सावगावला नगरपंचायतमध्ये दर्जा नको असल्यास आणि गावचा मंडोळी ग्रा.पं.मध्ये समावेश करण्यासंदर्भात आता आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढायला हवा, असे सावगाव येथील रहिवासी व बेनकनहळळी ग्रा. पं.अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा...
सावगाव गावचा नगरपंचायतीमध्ये समावेश होऊ नये, अशी आमची मागणी आहे. जर बेनकनहळळी ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा मिळत असेल तर सावगाव हे गाव मंडोळी ग्रामपंचायतला जोडण्यात यावे. हा पर्याय आम्हा गावकऱ्यांसाठी योग्य आहे. आमचे नगरपंचायतीमध्ये गेल्यास पाणीपट्टी घरपट्टीमध्ये वाढ होणार आहे. सर्वसामान्य लोकांसाठी रोजगार हमी योजना ही उदरनिर्वाहाचे साधन बनलेली आहे. जर गावातील महिलांचा रोजगार बंद झाला तर अनेकांच्या संसारात आर्थिक अडचण निर्माण होणार आहे. लोकप्रतिनिधींनी आमच्या सावगाव गावच्या स्थानिक लोकांची मागणी लक्षात घेऊन आम्हा गावकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करावेत.
- कल्लाप्पा पाटील, सावगाव