For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानातील मुहाजिरांना वाचवा

06:26 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानातील मुहाजिरांना वाचवा
Advertisement

कराची शहराचे नेते अल्ताफ हुसैन यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

पाकिस्तानात मोठा प्रभाव असलेल्या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानातील मुहाजिरांना वाचविण्याचे आवाहन केले आहे. मुत्तहिदा कौमी मूव्हमेंटचे (एमक्यूएम) संस्थापक अल्ताफ हुसैन यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची  कठोर शब्दांत निंदा केली आहे. अल्ताफ यांना पाकिस्तानी सैन्य आणि सरकारच्या विरोधात आवाज उठविल्यामुळे देश सोडावा लागला होता. 1947 मध्ये फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांना पाकिस्तानात मुहाजिर म्हटले जाते आणि आजही त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक समजले जाते.

Advertisement

फाळणीनंतर पाकिस्तानात भारतातून गेलेल्या मुस्लिमांना कधीच देशाचा वैध नागरिक मानले गेले नाही आणि पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर सातत्याने अत्याचार केले. पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत आतापर्यंत 25 हजारांहून अधिक मुहाजिरांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर हजारो लोकांना पाकिस्तानी सैन्याने गायब केले असल्याचा आरोप अल्ताफ हुसैन यांनी केला आहे.

हुसैन यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्यप्रमुख असीम मुनीर यांची ‘टू नेशन थेअरी’ फेटाळली होती. भारतात हिंदू आणि मुस्लीम शतकांपासून एकत्र शांततापूर्ण सह-अस्तित्वात राहत आहेत आणि ते नेहमीच मिळून-मिसळून राहत आहेत. भारतात हिंदू आणि मुस्लीम नियमितपणे परस्परांच्या घरी जातात, परस्परांच्या सणांमध्ये सामील होत असतात. फाळणीपूर्वी लोक हिंदूंसोबत शेजारी म्हणून सह-अस्तित्वात होते आणि भारताला दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागण्यात आले. त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघात केवळ एक भारत होता, पाकिस्तान किंवा बांगलादेशचे कुठलेच अस्तित्व नव्हते, असे म्हणत अल्ताफ यांनी मुनीर यांचा दावा फेटाळला होता.

पंतप्रधान मोदींनी मुहाजिरांचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित करावा आणि जगाच्या मानवाधिकार संघटनांनी मुहाजिरांच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे अल्ताफ यांनी म्हटले आहे.

अल्ताफ हुसैन यांनी 1986 मध्ये मुहाजिरांच्या अधिकारांसाठी एमक्यूएम या पक्षाची स्थापना केली होती. एकेकाळी अल्ताफ हुसैन यांच्या अनुमतीशिवाय कराची शहरात पानही हलू शकत नसल्याचे बोलले जायचे. अल्ताफ यांना तेथे ‘भाई’ असे संबोधिले जाते. परंतु मागील काही वर्षांमध्ये अल्ताफ हुसैन यांचा प्रभाव ओसरला आहे. 2018 च्या निवडणुकीपूर्वी त्यांचा तेथे मोठा प्रभाव असायचा. खासकरून सिंधमध्ये त्यांचा दबदबा होता. अल्ताफ यांनी पाकिस्तानात राहत असलेलया कोट्यावधी मुहाजिरांना आवाज मिळवून दिला आहे. पाकिस्तानात पश्तून, सिंध आणि बलुचांमध्ये असंतोष असून ते पंजाबी प्रभुत्वाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. तर मुहाजिरांची ओळख तर पाकिस्तानात बाहेरून आलेले लोक अशी करण्यात आली असून ते दशकांपासून अत्याचाराला तोंड देत आहेत.

 पाकिस्तानातील मुहाजिरांची स्थिती

मुहाजिरांना प्रारंभी समस्या झाली नाही, परंतु 1960 च्या दशकात गोष्टी बिघडत गेल्या. मोहम्मद अयूब खान यांनी सत्ता हाती घेतली, ते मुहाजिरांबद्दल द्वेष बाळगून होते, कराचीत राजधानी असल्याने मुहाजिरांचा प्रभाव अधिक होता, याचमुळे त्यांनी नवी राजधानी इस्लामाबाद येथे स्थापन केली. यामुळे मुहाजिरांचे वर्चस्व संपुष्टात आले, याशिवाय उर्दू बोलण्यावरुन देखील मुहाजिरांना लक्ष्य केले जाऊ लागले. कराचीत त्यांना भेदभावाला सामोरे जावे लागले.

कुटुंब मुळचे आगरा येथील

अल्ताफ हुसैन यांचा जन्म 17 सप्टेंबर 1953 रोजी नाजिर हुसैन आणि खुर्शीद बेगम या दांपत्याच्या पोटी कराची येथे झाला होता. त्यांचे पिता नाजिर हुसैन हे उत्तरप्रदेशच्या आगरा येथे राहत होते. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले, ते भारतीय रेल्वेत अधिकारी होते, नाजिर आणि खुर्शीद बेगम यांना पाकिस्तानात जायचे नव्हते, परंतु कुटुंबातील अन्य सदस्य गेल्याने त्यांनाही आगरा सोडावे लागले.

Advertisement
Tags :

.