अंदमानातही सावरकरांकडून हिंदूंचे संघटन
सात्यकी सावरकर यांचे प्रतिपादन : सरस्वती वाचनालयाच्यावतीने व्याख्यानमाला
प्रतिनिधी/ बेळगाव
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतानाही हिंदूंच्या एकत्रीकरणासाठी झटत होते. इस्लाम धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ऊर्दूचे शिक्षण घेतले. तेथील बारकावे जाणून घेत कुराणामधील तत्त्वज्ञान आपल्या विरोधी आहे, हे जाणून घेतले. त्यामुळेच हिंदूंचे संघटन त्यांनी सुरू केले. याची सुरुवात त्यांनी अंदमानातील हिंदूंना एकत्रित करून केली. आजही अंदमानात हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे ती सावरकरांच्या दूरदृष्टीमुळेच, असे विचार सात्यकी सावरकर यांनी मांडले.
सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. सात्यकी सावरकर यांनी ‘सावरकरांचा आदर्शवाद’ या विषयावर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, उपाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे व सचिव आर. एम. करडीगुद्दी उपस्थित होते.
सावरकरांनी हिंदू या शब्दाची जी व्याख्या केली, तसेच साधर्म्य असलेली व्याख्या संविधानातून करण्यात आली आहे. हिंदू नेमके कोणाला म्हणावे, हे सावरकरांनी अतिशय स्पष्टपणे नमूद केले आहे. सावरकरांना हुकूमशहा म्हणून काही जणांकडून बोलले जाते. परंतु अंदमान येथील सकाळी दिली जाणारी बांग सावरकरांनी निवेदनाच्या माध्यमातून बंद केली, हे विसरता येणार नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे मुस्लीमविरोधी होते, असे चित्र निर्माण केले जाते. परंतु ते मुस्लीमविरोधी नव्हते तर त्यांनी इस्लामची चिकित्सा केली होती. त्यांनी मुस्लिमांमध्येही जागृती करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. अनेक मुस्लीम व्यक्ती सावरकरांच्या ‘अभिनव भारत’मध्ये कार्यरत होत्या. इस्लाममधील काही बाबींवर त्यांनी प्रखर प्रहार केले. परंतु ते मुस्लीमविरोधी नव्हते, असे सात्यकी यांनी सांगितले. अक्षता व विनायक मोरे यांनी ईशस्तवन व सावरकर गीत सादर केले. सात्यकी सावरकर यांच्या हस्ते या दोघांचाही सत्कार झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा लोकुर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी, श्रोते उपस्थित होते. दरम्यान शनिवारी झालेले व्याख्यान हे अशा रतनजी यांनी कै.रुस्तुम रतनजी यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केले होते.