सावरकर स्मृती व्याख्यानमाला उद्यापासून
सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांतर्गत आयोजन : कार्यक्रम सर्वांना खुला
बेळगाव : कोरे गल्ली-शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांतर्गत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती व्याख्यानमाला दि. 25 व 26 फेब्रुवारी रोजी गोगटे कॉलेजच्या वेणुगोपाल सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. रविवार दि. 25 रोजी अक्षय जोग, पुणे यांचे ‘सावरकरांचा हिंदुत्ववाद या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जीआयटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी माधुरी शानभाग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. सोमवार दि. 26 रोजी माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे ‘सावरकरांचे जीवन आणि संदेश’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे वाचनालयाने कळविले आहे.
अक्षय जोग
अक्षय जोग हे इंजिनिअर असून केंद्र सरकारच्या शैक्षणिक मंत्रालयांतर्गत ‘स्वा. सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि हिंदू महासभा’ या विषयावर लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये संशोधन करण्यासाठी खास दौऱ्यावर जाऊन आले आहेत. स्वा. सावरकर आक्षेप आणि वास्तव, स्वा. सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे, आक्षेप आणि वास्तव, स्वा. सावरकर: परिचित-अपरिचित, स्वा. सावरकरांचे हिंदुत्व अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत. सा. विवेक निर्मित ‘कालजयी सावरकर’ माहितीपटासाठी त्यांनी संशोधन साहाय्य केले आहे. डॉ. अरविंद गोडबोले हिंदुत्व लेखन पुरस्कार, मामाराव दाते अभ्यासू विचारवंत पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
राजेंद्र बेळगावकर
बीई पदवीधर असणारे राजेंद्र बेळगावकर यांनी न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीच्या बरुक कॉलेजमध्ये एमबीएची पदवी घेतली. सिटी बँक व अमेरिकन एक्स्प्रेस सारख्या कंपनीमध्ये आर्थिक व रिस्क मॅनेंजमेंटचा अनुभव त्यांना आहे. अमेरिकेच्या ग्लोबल एक्स्प्रोजरमध्ये रिस्क मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम केले आहे. सीनेका संस्थेचे संस्थापक व प्राचार्य म्हणून नोव्हेंबरपासून कार्यरत आहेत. एमएसएमई व आरोग्य विभाग यांचे प्राथमिक सबलीकरण करण्यासाठी आर्थिक विश्लेषण व नियमन करत असतात. सिटी बँक न्यूयॉर्क येथे असिस्टंट व्हा. प्रेसीडेंट व अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीचे संचालक म्हणून काम केले आहे.
अविनाश धर्माधिकारी
अविनाश धर्माधिकारी हे 1986 च्या तुकडीचे माजी आयएएस अधिकारी आहेत. सनदी नोकरीपूर्वी दहा वर्षे ते पूर्णवेळ स्वयंसेवी कार्यकर्ते व मुक्त पत्रकार म्हणून कार्य करत होते. नोकरीमध्ये महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर त्यांनी सनदी अधिकारी म्हणून रत्नागिरी व अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्याच्या मुख्य सचिवांचे विशेष कर्तव्य अधिकारी, रायगडचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांच्ये उपसचिव असा पदभार सांभाळला. 1996 मध्ये त्यांनी सनदी सेवेचा राजीनामा दिला. याच वर्षी त्यांनी चाणक्य मंडल परिवार या नावाने सार्वजनिक धर्मादाय न्यासाची स्थापना केली. या माध्यमातून गेल्या 24 वर्षांमध्ये त्यांनी देशाला हजारो स्वच्छ व कार्यक्षम अधिकारी दिले आहेत. 2001 मध्ये भारत सरकारच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या कार्यकक्षेतील ‘नेहरु युवा क्रेंद संघटन’ या संस्थेचे मुख्य अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली. ‘75 सोनेरी पाने, अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक नवा विजयपथ’ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.