सौराष्ट्राने उडवला दिल्लीचा धुव्वा
रवींद्र जडेजाच्या 12 विकेट्स, सौराष्ट्राचा 10 गड्यांनी दणदणीत विजय : ऋषभ पंत दोन्ही डावात फ्लॉप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रणजी ट्रॉफीच्या सामन्यात, अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या सौराष्ट्र संघाने ऋषभ पंतच्या दिल्ली संघाचा केवळ 3.1 षटकांत म्हणजे 19 चेंडूत 10 गडी राखून पराभव केला. या विजयाचा शिल्पकार रवींद्र जडेजा ठरला, ज्याने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे त्याने 12 विकेट्स घेत दिल्लीचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 49.4 षटकांत सर्व गडी गमावून 188 धावा केल्या. कर्णधार आयुष बडोनीने संघाकडून सर्वाधिक 60 धावांची खेळी खेळली, तर यष्टीरक्षक ऋषभ पंत बऱ्याच वर्षांनी रणजी सामना खेळताना छाप सोडण्यात अपयशी ठरला. तो धर्मेंद्र सिंग जडेजाच्या चेंडूवर एक धाव काढून बाद झाला. रवींद्र जडेजाने या डावात5 विकेट्स घेतल्या. यानंतर सौराष्ट्रने पहिल्या डावात 72.2 षटकांत 271 धावा केल्या. सलामीवीर हार्विक देसाईने सर्वाधिक 93 धावांची खेळी केली, तर रवींद्र जडेजाने 38 आणि एव्ही वासवदाने 62 धावा केल्या. दिल्लीकडून हर्ष त्यागीने 4 तर आयुष बडोनीने 3 विकेट्स घेतल्या.
दिल्लीचा संघ 94 धावांत ऑलआऊट
दुसऱ्या डावात दिल्लीला आपल्या फलंदजांकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. यावेळी दिल्लीचा संघ अवघ्या 94 धावांत गडगडला. आयुष बडोनीने पुन्हा एकदा संघासाठी 44 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. इतर दिल्लीचे खेळाडू मात्र सपशेल फ्लॉप ठरले. पंतला केवळ 17 धावा करता आल्या. रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावातही शानदार गोलंदाजी करताना 38 धावांत 7 विकेटस घेण्याची किमया केली. दिल्लीचा संपूर्ण संघ 94 धावांत ऑलआऊट झाल्यानंतर सौराष्ट्राला केवळ 12 धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी हे लक्ष्य 3.1 षटकांतच पूर्ण करत दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला.

शार्दुल ठाकूरचे नाबाद शतक, मुंबईकडे 188 धावांची आघाडी
मुंबई : रणजी चषकात जम्मू काश्मीर विरुद्ध सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत दुसऱ्यांदा लाज राखली. रोहित शर्मासह यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर या दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पुन्हा एकदा नांगी टाकल्यानंतर, शार्दूल ठाकूरने नाबाद शतकी खेळी साकारली. दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने 7 बाद 274 धावांपर्यंत मजल मारली असून, शार्दूल ठाकूर नाबाद 113 आणि तनुष कोटियन 58 धावांवर खेळत आहेत. मुंबईला दुसऱ्या डावात 188 धावांची आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या डावातही शार्दूलच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 120 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या जम्मू काश्मिरचा पहिला डाव मुंबईने 206 धावांत गुंडाळला होता. त्यामुळे जम्मू काश्मिरकडे पहिल्या डावात 86 धावांची आघाडी मिळाली होती. ही आघाडी मोडून मुंबईला जम्मू काश्मीरविरुद्ध मोठे टार्गेट ठेवण्याचे आव्हान असणार आहे.
मुंबईकडून दुसऱ्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी केली. या दोघांनीही आक्रमक सुरुवात करताना अर्धशतकी भागीदारी केली. रोहित शर्माने सुरुवातीपासूनच वेगवान धावा करण्याचा प्रयत्न केला. त्याने तीन षटकार ठोकून आपल्या फलंदाजीचे संकेत दिले. रोहित शर्मा सेट झाला असं वाटत असतानाच, युधवीर सिंगने त्याला बाद केलं. रोहित 28 धावा करुन माघारी परतला. यानंतर हार्दिक तोमोर 1, यशस्वी जैस्वाल 26, श्रेयस अय्यर 17, अजिंक्य रहाणे 16, शिवम दुबे 0 आणि शाम्स मुलानी 4 धावांवर बाद झाल्याने, मुंबईची अवस्था 7 बाद 101 अशी झाली होती. पण, शार्दुल ठाकूरने डावाची सूत्रे हातात घेतली. तनुष कोटियनसोबत त्याने 173 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली.