सौरभ घोषाल व्यावसायिक स्क्वॅशमधून निवृत्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जवळपास दोन दशके आंतरराष्ट्रीय स्क्वॅश क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी करणारा भारताचा अव्वल स्क्वॅशपटू सौरभ घोषालने सोमवारी व्यावसायिक स्क्वॅश क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहिर केली. दरम्यान व्यवसायिक क्षेत्रातून निवृत्त झाला असला तरी तो आणखी काही काळ भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
भारतीय स्क्वॅश क्षेत्रामध्ये 37 वर्षीय सौरभ घोषालने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. इंचॉन आणि हाँगझाऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सौरभ घोषालने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर सांघिक प्रकारात 2 सुवर्णपदके मिळविली होती. घोषालने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 3 पदकांची कमाई केली. तसेच ग्लास्गो येथे झालेल्या 2022 च्या विश्व दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत घोषालने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळविले होते. 22 वर्षापूर्वी घोषालने आपल्या स्क्वॅश क्षेत्राला प्रारंभ केला. त्यानंतर त्याने व्यवसायिक स्क्वॅश क्षेत्रात सातत्याने दर्जेदार कामगिरी करत जागतिक स्तरावरील स्क्वॅश स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.
कोलकाता येथे जन्मलेल्या सौरभ घोषालने भारतीय स्क्वॅश क्षेत्राचा दर्जा उंचावण्यास आपला हातभार चांगलाच लावला. भारतीय स्क्वॅश क्षेत्रातील सुवर्णयुगात दिपिका पल्लीकर तसेच ज्योत्स्ना चिन्नाप्पा यांच्या समवेत घोषालचाही समावेश होता. विश्व स्क्वॅश क्षेत्रामध्ये पुरूषांच्या विभागात पहिल्या 10 स्क्वॅशपटूंमध्ये सौरभ घोषालचा समावेश होता. 2019 च्या एप्रिलमध्ये स्क्वॅशच्या पुरूष मानांकनात घोषालने पहिल्या 10 स्क्वॅशपटूंमध्ये स्थान मिळविले होते. 2003 साली घोषालने व्यवसायिक स्क्वॅश क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने 10 वेळेला व्यवसायिक स्क्वॅश स्पर्धेतील अजिंक्यपदे मिळविली. तर 18 वेळा त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्क्वॅश टूरवर त्याने 511 पैकी 281 सामने जिंकले. घोषालने 13 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविण्याचा पराक्रम केला. 2021 च्या नोव्हेंबरमध्ये घोषालने मलेशियन खुल्या स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपद मिळविताना कोलंबियाच्या टॉप सिडेड रॉड्रिग्जचा पराभव केला होता. माल्कम विलस्ट्रॉप, डेमन ब्राऊन, डेव्हिड पामेर, जेम्स विलस्ट्रॉप, डॉ. श्रेयल कॅलेडर, गायत्री मडकेकर, कृष्मी चेडा यांच्या सहकार्यामुळे आणि अनेक अव्वल प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी स्क्वॅश क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करु शकलो याबद्दल घोषालने या सर्व सहकाऱ्यांचे तसेच भारतीय क्रीडा मंत्रालयाचे आभार मानले आहे.