For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौदी अरेबियाचा रुसवा पॅलेस्टाईनवर

06:20 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
सौदी अरेबियाचा रुसवा पॅलेस्टाईनवर
Advertisement

भारत, इंग्लंड, अमेरिका व युरोपियन देशातील मुस्लिम पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून हिंसाचार घडवून सर्वसामान्यांना वेठीस धरतात. इस्त्रायलविरोधात  संबंधीत सरकारांनी आपले मत मांडावे यासाठी आग्रह धरतात. पण सौदी अरेबिया, युएई, कुवेत, कतार आदी देशातील नागरिक पॅलेस्टाईनसाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसत नाही. या उलट सौदी अरेबियात पॅलेस्टाईनचे समर्थन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

इस्त्रायलने हमास आणि हिजबुल्लाच्या प्रमुखांसहीत बड्या नेत्यांना ठार करून त्यांचे कंबरडे मोडलेले आहे. हमास प्रमुख हनिए यांना इराणमध्येच कंठस्नान घातल्यानंतर आठवड्याभरापूर्वी हिजबुल्ला प्रमुख नसरुल्ला आणि त्याच्या बड्या कमांडरचा काटा काढण्यास इस्त्रायलला यश मिळाले. या घटनेने इस्लामिक जगतात खळबळ माजली असली तरी इराण वगळता बहुतांश मुस्लिम देशांनी औपचारीक निषेध व्यक्त करण्यात समाधान मानले. मात्र सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांनी मौन धारण करण्याचे धोरण स्वीकारले. वर्षभरापूर्वी हमासने इस्त्रायलवर हल्ला करून त्याच्या नागरिकांना बंधक बनविल्यानंतर गाझापट्टी व पॅलेस्टाईनवर इस्त्रायल सरकारने जोरदार कारवाई केली. या कारवाईचा जगभरात निषेध सुरु झाला. इराण, तुर्कस्तान, सिरीया आदी देशांनी इस्त्रायलला इशारे देण्यास सुरुवात केली. मात्र इस्त्रायलचे रौद्र रुप पाहून इराण वगळता सर्व इस्लामिक देशांची बोबडी वळली.

सौदी अरेबियाने तर मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीतही आपले मौन सोडलेले नाही. या उलट देशातील मशिदीतून पॅलेस्टाईनचे समर्थन करणारी प्रवचने बंद करणारे आदेश देण्यात आलेले आहेत. देशाच्या कोणत्याही भागात पॅलेस्टाईनचे समर्थन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. इस्त्रायलने केलेल्या कारवाईला प्रत्यूत्तर म्हणून इराणने शेकडो क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यातील काही क्षेपणास्त्रे सौदी अरेबियाने आपल्या हवाई हद्द्ाrत घुसल्याचा ठपका ठेवत खाली पाडली. इस्त्रायलचा शेजारी जॉर्डन सरकारनेही सौदी अरेबियाचा कित्ता गिरविला.

Advertisement

पॅलेस्टाईन सरकारचे एकेकाळी समर्थक असलेल्या सौदी अरेबियाने आता शत्रू राष्ट्राची भूमिका घेतलेली आहे. यापूर्वी अरब राष्ट्रांनी इस्त्रायलवर एकत्रितपणे हल्ला केला होता. त्यावेळी सौदी अरेबिया हल्ला करणाऱ्या अग्रेसर देशांपैकी एक होता. इराणचे सर्वेसर्वा आयातोल्ला खेमनेई यांनी इस्त्रायलला संपविण्याची घोषणा केल्यानंतर 57 इस्लामिक देशांपैकी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या मुस्लिम देशांनी समर्थन केले. सौदी अरेबिया या सर्व घडामोडीपासून अद्याप अलिप्त राहिलेला आहे. त्याला कारणेही बरीच आहेत. इराण सरकार इस्त्रायलला दगाफटका करण्यासाठी पॅलेस्टाईनमध्ये हमास व शेजारी लेबनॉनमध्ये हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांना अर्थ पुरवठा करत आहे. त्याचप्रमाणे सौदी अरेबियातही इराणकडून दहशतवादी संघटना उभारलेल्या आहेत. तर शेजारी राष्ट्र असलेल्या येमेनमध्ये इराण समर्थक हौथीचा दबदबा आहे.

सौदी अरेबियाचे शेजारी राष्ट्र असलेल्या येमेनमध्ये हौथी दहशतवादी संघटनेने तेथील सौदी समर्थकाची सत्ता दहा वर्षांपूर्वी उलथवून लावली होती. त्यानंतर सौदी अरेबियाने येमेनवर हल्ला केला होता. तब्बल 5 वर्षांनंतर सौदी अरेबियाला या युद्धातून नामुष्कीजनक माघार घ्यावी लागली. त्याचाच बदला आज सौदी अरेबियाकडून चुकता करण्यात येत आहे. येमेनमधील सौदी अरेबिया व त्याच्या मित्र राष्ट्रांना माघार घ्यावी लागल्याने जगात त्यांची वेगळीच प्रतिमा निर्माण झाली. इराणमुळे झालेल्या नाचक्कीचा बदला घेण्याची संधी लाभलेली आहे.

येमेनमधील या घटनेनंतर इस्त्रायलने गेल्या चार वर्षांत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन आदी देशांबरोबर मैत्रिसंबंध प्रस्थापित करण्यास नेतन्याहू यांना यश मिळाले. त्यामुळेच इराण सध्या एकाकी पडलेला आहे. सौदी अरेबियाने आपल्या हवाई क्षेत्रातून जाणाऱ्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्याचे तंत्र आरंभलेले आहे. जॉर्डन सरकारनेही आपले हवाई क्षेत्र बंद केलेले आहे.

हमास आणि हिजबुल्लानंतर आता इस्त्रायलने आपले लक्ष्य हौथी या संघटनेवर केंद्रित केलेले आहे. सौदी अरेबियाला येमेनमधील हौथी दहशतवाद्यांनी बरेच सतावलेले आहे. सौदी अरेबिया जगातील श्रीमंत देश असला तरी सैन्य ताकत अगदीच क्षीण असल्याने इराण आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच इराण हा परमाणू संपन्न देश असल्याने त्याचाही धाक व भीती सौदी अरेबियाला सतावत असते. या सर्वांचा परिणाम म्हणूनच 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलवर हल्ला करून शेकडो इस्त्रायली नागरिकांना ठार करण्याबरोबरच काही नागरिकांचे अपहरण केल्यानंतर इस्त्रायलने केलेल्या प्रतिशोधात्मक कारवाईला आता एक वर्ष पूर्ण होत असले तरी, सौदी अरेबियाने इस्लाम खतरे मे है, अशी आरोळी न ठोकता मौन धारण केलेले आहे. सौदी अरेबियासाठी पॅलेस्टाईन आता इस्लामिक जगताचा मुद्दा राहिलेला नाही, हीच आता इस्लामिक कट्टरपंथीयांसाठी चिंतेची बाब बनली आहे..

- प्रशांत कामत  

Advertisement
Tags :

.