For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौदी अरेबिया सुंदरी घालणार विश्वाला गवसणी?

06:49 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
सौदी अरेबिया सुंदरी घालणार विश्वाला गवसणी
Advertisement

जगावर वर्चस्व गाजविणारी आखाती राष्ट्रे आता आपली अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी धडपडत आहे. जगभरातील देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या भागात लिथीयमचा साठा शोधत आहेत. पुढील दहा वर्षांत ऑपेक संघटनेला जग विसरूनही जाईल. एव्हाना बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा बोलबाला सुरु झालेला आहे. खनिज तेलाचे वर्चस्व काही काळातच संपुष्टात येणार असल्याने दुबईने मुक्त व्यापार केंद्र बनविण्याचा ध्यास पूर्ण केला. सौदी अरेबिया आपल्या देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी राजसत्तेच्या नियमांना युटर्न देत महिलांना बुरखा संस्कृतीतून बाहेर काढून यंदाच्या विश्व सुंदरी स्पर्धेत आपली सुंदरी उतरवत आहे.

Advertisement

मॅक्सिकोमध्ये सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्व सुंदरी तथा मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी सौदी अरेबियाची सुंदरी रमी अल् खतानी मोठी तयारी करत आहे. आठ वर्षांपूर्वी ज्या देशात महिलांना पुरुष मार्गदर्शकाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई होती. त्या देशात आज महिलांना गाडी चालविण्याचा परवाना देण्यास सुरुवात झालेली आहे. सार्वजनिक ठिकाणी काम करण्याची मुभा मिळाली. सौदी अरेबियाच्या सैन्यात भरती होण्यासाठी महिलांना परवानगी मिळालेली आहे. कोविड महामारीच्या काळात सौदी अरेबियात केवळ दोन वर्षांत सौदी महिला कर्मचाऱ्यांची भरती 66 टक्क्यांनी वाढली. 2018 ते 2020 या काळात सौदी महिला कर्मचाऱ्यांचा आकडा 19 टक्क्यांवरून 33 टक्क्यांवर पोहोचला.

सौदीचे युवराज महंमद बिन सलमान यांनी देशाची सत्तासूत्रे आपल्या हाती घेतल्यापासून अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत. त्यांनी 2016 साली सौदी अरेबिया 2030 धोरणाची घोषणा केली. सौदी अरेबियाची पेट्रोलियम पदार्थांवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी देशात माहिती तंत्रज्ञान, अवजड उद्योग, पर्यटन आदी उद्योगांना आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या धोरणात अमुलाग्र बदल घडवून आणलेले आहेत. राजा अब्दुल्लाजिज यांनी देशात आधुनिकता आणण्याचा हलकासा प्रयत्न केला होता. त्यांच्या काळात पेट्रोलियम पदार्थाला समर्थ पर्याय आला नव्हता. मात्र त्यांच्या पश्चात जगात अनेक बदल घडून आले. त्यात 2014 ते 2018 पर्यंत कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होत असलेली घसरण सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब बनली होती. यात 2015 साली राजा अब्दुल्लाजिज यांचे निधन झाल्यानंतर सलमान बिन अब्दुल्लाजिज अल् सौद यांच्या हाती राजसत्ता आली.

Advertisement

राजा सलमान यांना राजगादी मिळवून देण्याची मोठी कामगिरी त्याचे पुत्र महंमद बिन सलमान यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी युवराज पदाची माळ गळ्यात घालून घेतली. गंभीर आजारी असलेल्या राजा सलमान यांचे सर्व कामकाज महंमद बिन सलमान यांनीच हाताळण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी 2016 साली सौदी अरेबियाचे व्हिजन 2030 जाहीर केले. यात त्यांनी सौदी अरेबियाच्या आधुनिकीकरणाचा आराखडा सादर केला. या आराखड्यानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेला देशातील कच्च्या तेलाच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता अन्य स्त्रोतांचा पर्याय त्यात मांडलेला आहे. व्हिजन 2030 मध्ये पर्यटन, तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन ते राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग बनविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी सौदी अरेबियामध्ये असलेल्या रुढीवादी परंपरांपासून फारकत घेणे आवश्यक बनले. आखाती देशांत कुवेत आणि सौदी अरेबिया कट्टरपंथीय विचारधारा राजसत्तेशी निगडीत असल्याने तिथे अपराधाला मृत्यूदंड हे ठरलेले असल्याने या देशाची प्रतिमा पर्यटन जगतात काळवंडलेली आहे. वस्त्र परिधान संबंधी असलेले कडक नियम विशेषत: पाश्चात्य पर्यटकांना सौदी अरेबियात पाय ठेवण्यासाठी अनुत्साही वाटतात. त्यातल्या त्यात या देशात असलेले महिलांविरोधातील कायदे कानून बाधक ठरत असत. या सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी सौदीच्या युवराजांनी एकामागोमाग एक असे निर्णय घोषित केले. सुरुवातीला त्यांनी देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोहिम राबविली.

महिला कल्याणासाठी सौदीमधील महिलांना सरकारी आणि खासगी क्षेत्र खुले करण्यात आले. कामाच्या ठिकाणी वेशभूषाविषयक जाचक अटी शिथील करण्यात आल्या. तसेच महिलांना रात्रपाळीत काम करण्यास मान्यता देण्याबरोबरच काही मोजकी व्यापार व उद्योग क्षेत्रे वगळता अन्य सर्व क्षेत्रात महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे. यापूर्वी डॉक्टर व तत्सम सेवा क्षेत्रात काम करणे शक्य होत असे.  तीन तलाक संदर्भात महिलांना सुरक्षा मिळवून दिली. पुरुष मार्गदर्शकासहीत कोणत्याही समारंभाला जाण्यास मोकळीक दिली. तसेच मार्गदर्शकाशिवाय गाडी चालविण्याची मुभा दिली.

पर्यटनाला जागतिक मान्यता देण्यासाठी सौदी अरेबिया आता आपल्या सैंदर्य सुंदरीला मॅक्सिकोतील विश्व सौंदर्य स्पर्धेत उतरविण्याच्या बेतात आहे. त्या संदर्भात सौदी अरेबियाची सुंदरी रमी अल् खतानी यांनी सोशल मिडीयावर ही माहिती दिली.

सौदी अरेबिया सरकारने रमी अल् खतानी यांनी दिलेल्या माहितीवर सौदीतर्फे त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही. पण विश्व सुंदरी स्पर्धेच्या आयोजकांनी सौदी अरेबियातर्फे अजून भाग घेतला नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. पण सौदी अरेबियाने रमी अल् खतानी यांची सोशल मीडियावरील माहिती खोटी असल्याचे अजून तरी सांगितलेले नाही. सौदी अरेबिया आता बदलू पाहतोय हेच या घटनेवरून स्पष्ट होते.

  -प्रशांत कामत

Advertisement
Tags :

.