For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुर्की आणि ग्रीस यांच्यात मित्रतेचे वारे

06:49 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
तुर्की आणि ग्रीस यांच्यात मित्रतेचे वारे
Advertisement

भारत आणि पाकिस्तानप्रमाणेच कट्टर शत्रुता बाळगणाऱ्या ग्रीस आणि तुर्की या देशांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या पन्नास वर्षांतील कटुता विसरुन दोन्ही देशांनी साधलेली मैत्री कौतुकास्पद बाब बनली आहे. दोन्ही देशांना विभागणाऱ्या एजियन समुद्रात असलेली दोन हजार बेटे तणावाचे कारण बनलेले आहे.

Advertisement

जगात सध्या युद्धाचे काळे ढग दिवसेंदिवस वाढतच आहेत. अर्मेनिया आणि कजाकस्तान, रशिया आणि युक्रेन, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या देशांत सध्या जोरदार युद्ध सुरु आहे. अशा या निराशादायी वातावरणात तुर्की व ग्रीस यांच्याबाबतीत सुखद माहिती समोर आली आहे. तुर्कीच्या प्रयत्नातून ग्रीसबरोबर मित्रतेचे संबंध प्रस्तापित होत आहेत. या दोन्ही देशांत गेल्या पन्नास वर्षांपासून एजियन समुद्रात असलेल्या असंख्य बेटांवरून वाद सुरु होता. हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नसली तरी उभय देशांच्या प्रमुखांनी मोठ्या कालखंडानंतर एकमेकांच्या देशांना भेटी देऊन सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष ताईप एअरडोगन यांनी डिसेंबर 2023 ग्रीसला भेट दिली व मे 2024 मध्ये ग्रीसचे पंतप्रधान किरीयाकोस मिसोटाकीस यांनी अंकाराला भेट देऊन उभय देशांत मित्रत्वाचे संबंध बळकट करण्यावर भर दिला.

भूमध्य सागर, एजिएन समुद्रातील बेट समूह आणि सायप्रस हे ग्रीस आणि तुर्की यांच्यातील वादाचे मूळ कारण आहे. तुर्की भूमध्य समुद्रावर आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतो. तर ग्रीस एजिएन समुद्रावर आपला मालकी हक्क गाजवत आहे. या समुद्रात 2000 बेटे असून 1200 बेटांवर ग्रीसची मालकी आहे. या 2000 बेटांपैकी केवळ 227 बेटांवर मनुष्यवस्ती आहे. यातील 220 बेटांवर ग्रीसचे प्रशासकीय नियंत्रण असून उर्वरित केवळ 7 बेटांवर तुर्कीचे नियंत्रण असून त्यातील दोन बेटांवर सर्व प्रकारच्या साधन सुविधा उपलब्ध आहेत. या मानवी वस्तींच्या बेटांपासून 12 नॉटिकल मैल अर्थात साधारणत: 21 किलोमीटरच्या परिघात अन्य देशांना प्रवेश नसल्यानेच ग्रीस आणि तुर्की यांच्यात गेल्या 50 वर्षांपासून तणावाचे वातावरण बनलेले आहे.

Advertisement

तुर्कीला शेकडो किलोमीटरची किनारपट्टी असूनही तिथे जवळच असलेल्या ग्रीसच्या वस्ती असलेल्या बेटांमुळे ग्रीस आपले समुद्री क्षेत्र मानत असल्याने संपूर्ण एजियन समुद्रावर ग्रीसची एकाधिकारशाही सुरु आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या समुद्रविषयक नियमावलीनुसार भूभागापेक्षा वस्ती असलेल्या बेटांना त्यांच्या सभोवताली 21 किलोमीटरचा परिघात वापरता येतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या या समुद्री कायद्याचा आधार घेत ग्रीस आपला मालकी हक्क गाजवत असल्याने एजियन समुद्रातील सर्वप्रकाच्या स्त्रोतांवर दावा करत असतो. यात मासळी, खनिज साठे आदी उत्खननांवर आपला अधिकार असल्याचे सांगून तुर्कीला कोणतीही कृती करण्यापासून अडथळा आणत असतो. त्याचबरोबर या समुद्रातून जाणारी जहाजे किंवा समुद्रांवरून उडणारी विमाने यांना ग्रीसची परवानगी आवश्यक असते. ग्रीसच्या या हेकेखोरीला शह देण्यासाठी तुर्की सरकार विविध प्रकारचे उपद्व्याप करत असते.

ग्रीसला शह देण्यासाठी 1974 साली ग्रीस वंशीय ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांचा भरणा असलेल्या सायप्रसवर हल्ला करून त्याचा 25 टक्के हिस्सा तुर्कीने आपल्या ताब्यात घेतला. तेथील दीड लाख सायप्रस नागरिकांपैकी काही लोकांना आपले

प्राण गमवावे लागले, तर हजारो नागरिकांनी तेथून पलायन केले, तर काही नागरिकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले. या घटनेवरून या दोन्ही देशांत शत्रूत्व निर्माण झाले ते आजतागायत सुरु होते. गेल्या दहा वर्षांत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एअरडोगन यांनी यातील काही बेटे बळकावून त्यावर वस्ती उभारण्याच्या हालचालींना वेग दिला. जेणेकरून या बेट परिसरात इंधन तेलाचे साठे मिळविण्याचा तुर्कीचा प्रयत्न

आहे.  तुर्कीच्या या हल्लेखोर वृत्तीत सातत्याने वाढ होत गेली. त्यातून दोन्ही देशांत खटके उडण्यास सुरुवात झाली. एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची बडतर्फी करणे, हवाई क्षेत्रात एकमेकांच्या विमानांना उडण्यासाठी बंदी घालणे, व्यापारावर आयात शुल्क वाढविणे, पर्यटनाला मारक ठरतील असे उपद्व्याप सुरु झाले.

ग्रीस आणि तुर्की हे दोन्ही देश नाटोचे सदस्य असल्याने अन्य युरोपिय देशांना उभय देशांच्या भांडणात काही करता येत नव्हते. मात्र नाटो संघटनेतील बहुतांश  सदस्य ख्रिस्ती बहूल असल्याने त्यांचा ख्रिस्ती धर्मिय ग्रीसला पाठिंबा असल्याने हा देश एजिएन समुद्रातील बेटसमुहांच्या साहाय्याने तुर्कीला त्याच्या किनारपट्टी भागात विकासकामे हातात घेण्यास आडकाठी आणत असत. नाटोतील बहुतांश सदस्यांचा ग्रीसला छुपा पाठिंबा लाभत असल्याने तुर्कीला नाटो संघटनेत एकाकी पाडले जात असे. या संधीचा रशिया फायदा घेत असे. नाटो संघटनेचा सदस्य देश असूनही रशियाने तुर्कीला एस 400 या क्षेपणास्त्र प्रणालीची विक्री केली होती. तुर्कीने रशियाकडून ही क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केल्यानंतर अमेरिकेने एफ 35 या रडाराला हुलकावणी देणाऱ्या पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या विक्रीवर बंदी लादली. ग्रीसला नाटोतील अन्य सदस्य सातत्याने झुकते माप देत असल्याने तुर्कीने अखेर थेट संघर्षाचा पवित्रा अवलंबला.

तुर्कीमधील अल्पसंख्यांक असलेल्या ख्रिस्ती समाजाला सतावण्याचे काम सुरू झाले. पन्नास वर्षांपूर्वी 20 ते 25 टक्के असलेले ख्रिश्चन आता केवळ एक टक्का राहिलेले आहेत. बहुतांश अल्पसंख्यांकांना इस्लामची दिक्षा दिलेली आहे. गेल्या दशकात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसीप ताईप एअरडोगन यांनी ऑर्थोडॉक्स

ख्रिश्चनांच्या प्रार्थनास्थळांचे मशिदीत रुपांतर करण्यास सुरुवात केलेली आहे. 2016 पासून आतापर्यंत डझनभर चर्चचे मशिदीत रुपांतर केलेले आहे. यासाठी एअरडोगन सरकार खास आर्थिक तरतूद करत असते. ग्रीस आणि तुर्कीच्या या शत्रुत्वाला गेल्यावर्षी तुर्कीमध्ये आलेल्या भयंकर भूकंपामुळे लगाम बसला. मागील वर्षी फेब्रुवारी 2023 मधील तुर्कीमधील दीड कोटी लोकसंख्येला विस्थापित करणाऱ्या भूकंपावेळी मदत करण्यासाठी सर्वप्रथम ग्रीसचे पथक तुर्कीमध्ये दाखल झाले. शेजारधर्म निभावणाऱ्या ग्रीसबरोबर अखेर तुर्कीने समझोत्याचा हात पुढे केला.

प्रशांत कामत   

Advertisement
Tags :

.