सात्विक-चिराग, लक्ष्यचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/टोकियो
जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी पुढे चालू राहिली असून लक्ष्य सेन, सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत समाप्त झाले. जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर असणाऱ्या लक्ष्य सेनला जपानच्या कोदाय नाराओकाने 21-19, 21-11 असे हरवित तिसरी फेरी गाठली. पहिल्या लढतीत लक्ष्यने चीनच्या वांग झेंग झिंगचा पराभव करून आश्वासक कामगिरी केली होती. पण दुसऱ्या फेरीत त्याला हा जोम टिकविता आला नाही. पुरुष दुहेरीत सात्किव-चिराग यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. पाचव्या मानांकित चीनच्या लियांग वेइ केंग व वांग चँग यांनी त्यांच्यावर 24-22, 21-14 अशी मात केली. पॅरिस
ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकलेल्या केंग-चँग यांनी भारतीय जोडीवरील वर्चस्व कायम राखले असून आतापर्यंतच्या नऊ लढतीत त्यांनी 7 तर भारतीय जोडीने केवळ दोन लढती जिंकल्या आहेत. संथ सुरुवातीनंतर भारतीय जोडीने 18-14 अशी आघाडी घेत चांगले प्रदर्शन केले. पण ही आघाडी त्यांना टिकविता आली नाही आणि चुरशीचा झालेला हा रोमांचक गेम चिनी खेळाडूंनी जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही चिनी जोडीने वर्चस्व कायम राखले तर सात्विक-चिरागला स्मॅशेस व बचावासाठी संघर्ष करावा लागला आणि हा गेम 21-14 असा जिंकत चिनी जोडीने आगेकूच केली. भारतीय जोडीवर त्यांनी मिळविलेला हा सलग चौथा विजय आहे.