सात्विक-चिराग, लक्ष्य सेन उपविजेते
हाँगकाँग ओपन बॅडमिंटन सुपर 500 : चिनी खेळाडूंकडून दोघांचाही पराभव
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
भारताची पुरुष दुहेरीची अव्वल जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी तसेच एकेरीतील अव्वल खेळाडू लक्ष्य सेन यांना येथे झालेल्या हाँगकाँग ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत त्यांना अनुक्रमे चीनच्या लियांग वेइ केंग व वांग चँग आणि चीनच्याच लि शि फेंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
जागतिक व्र्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या सात्विक-चिराग यांनी गेल्याच महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकले होते. येथील लढतीत त्यांना एका गेमच्या आघाडीचा लाभ घेता आला नाही आणि सहाव्या मानांकित चिनी जोडीकडून त्यांना 21-19, 14-21, 17-21 असा 62 मिनिटांच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्याने चिनी जोडीला जेतेपद मिळाले. थायलंड ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर गेल्या 16 महिन्यांत सात्विक-चिराग पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळत होते. या पराभवामुळे सुपर 500 स्पर्धेच्या अंतिम फेरीतील त्यांचे परफेक्ट रेकॉर्ड खंडित झाले आहे. याआधी त्यांनी चारही सुपर 500 स्पर्धा जिंकल्या होत्या. चिनी जोडी व भारतीय जोडी यांच्यात 9 लढती झाल्या होत्या, त्यात 3 भारतीय तर 6 चिनी जोडीने जिंकल्या होत्या. पॅरिसमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सात्विक-चिरागने त्यांना हरविले होते. पहिला गेम जिंकल्यानंतर तोच जोम त्यांना नंतर टिकवता आला नाही. निर्णायक गेममध्ये तर ते ब्रेकवेळी 2-11 असे खूप मागे पडले होते. पहिला गेम मात्र अतिशय चुरशीचा झाला. पण नंतर दुसरा गेम गमविल्यानंतर सात्विक-चिराग यांनी पिछाडीवर पडले असूनही चांगली झुंज दिली. पण अखेर त्यांना हा गेमसह जेतेपदही गमवावे लागले.
फेंगकडून लक्ष्य पराभूत
पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनलाही रौप्यपदक मिळाले. चीनच्या लि शि फेंगने त्याला 21-15, 21-12 असे हरवित सुवर्ण पटकावले. फेंगने नेटजवळ वर्चस्व गाजवत हा विजय साकार केला. 45 मिनिटे ही झुंज रंगली होती. लक्ष्यने नेटजवळ शानदार खेळ करीत 4-0 अशी झटपट आघाडी घेतली. पण फेंगने जोरदार स्मॅशवर त्याची आघाडी कमी केली. नंतर लक्ष्यच्या काही चुकांमुळे त्याची आघाडी 5-3 अशी झाली. फेंगने लक्ष्यवर स्मॅशेसचा भडिमार करीत त्याला जेरिस आणल्याने लक्ष्यची आघाडी 6-4 अशी राहिली. 8-8 वर फेंगने त्याला गाठले आणि शरीराच्या दिशेने फटके मारत आघाडीही घेतली. लक्ष्याने त्याला 9-9 वर गाठले. ब्रेकवेळी फेंगने 11-10 अशी आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर मात्र फेंगने आघाडी वाढवत हा गेम घेतला. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने बऱ्यापैकी प्रतिकार केला. पण फेंगने त्याला मागे टाकत गेमसह जेतेपदही निश्चित केले.