सात्विक-चिराग उपांत्य फेरीत , सिंधू पराभूत
वृत्तसंस्था/ शेनझेन, चीन
भारताची पुरुष दुहेरीची अव्वल जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी येथे सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविले तर पीव्ही सिंधूला पुन्हा एकदा कोरियाची ऑलिम्पिक चॅम्पियन अॅन से यंगकडून पराभव स्वीकारावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले.
माजी जागतिक अग्रमानांकित सात्विक-चिराग यांनी अलीकडेच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा कांस्यपदक मिळविले तर हाँगकाँग ओपनमध्ये गेल्या आठवड्यात उपविजेतेपद मिळविले होते. येथील सामन्यात त्यांची चीनची जोडी रेन जियांग यु व झाय हाओनन यांच्यावर 21-14, 21-14 असा सफाईदार विजय मिळवित शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. सात्विक-चिराग सध्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असून त्यांची उपांत्य लढत मलेशियाच्या दुसऱ्या मानांकित अॅरोन चिया व सोह वुइ यिक यांच्याशी शनिवारी होईल.
महिला एकेरीत जागतिक अग्रमानांकित कोरियाच्या अॅन से यंगविरुद्ध सिंधूची पराभवाची मालिका पुढे चालू राहिली. यंगने सिंधूवर 21-14, 21-13 असा विजय मिळविला. यंगने आठव्या मॅचपॉईंटवर सामना संपवला. यंगकडून झालेला सिंधूचा हा सलग आठवा पराभव आहे. ‘गेला आठवडा माझ्यासाठी फार चांगला गेला नाही. पण येथे उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आल्याने हा आठवडा खरोखरच सकारात्मक आणि प्रोत्साहित करणारा ठरला. हा जोम टिकवून ठेवणे व त्यात सातत्य राखणे, हे महत्त्वाचे ठरणार आहे,‘ असे सिंधू म्हणाली.