सात्विक-चिराग दुसऱ्या फेरीत
ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन : त्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद पहिल्या फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/सिडनी, ऑस्ट्रेलिया
भारताची दुहेरीतील स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी येथे सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. या जोडीने चिनी तैपेईच्या चँग को चि व पो लि-वेई यांचा पराभव केला. महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. जागतिक तिसऱ्या मानांकित भारतीय जोडीने तैपेईच्या जोडीवर 25-23, 21-16 अशी 48 मिनिटांच्या चुरशीच्या लढतीत मात करून दुसरी फेरी गाठली. सात्विक व चिराग यांना येथे अग्रमानांकन मिळाले असून याआधी त्यांनी हाँगकाँग सुपर 500 व चायना मास्टर्स सुपर 500 या स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. सात्विक-चिराग पहिल्या गेममध्ये 2-6 असे पिछाडीवर पडले होते. पण यानंतर दोन्ही जोड्यांनी तोडीस तोड खेळ करीत चुरस निर्माण केली. एका दीर्घ रॅलीत शानदार नेट शॉट मारल्यानंतर भारतीय जोडीला गेमपॉईंट मिळाला.
पण जोरदार स्मॅशवर तैवानी जोडीने तो वाचवला. चिरागने एक चूक केल्याने को चि आणि लि वेई यांना गेमपॉईंट मिळाला. पण त्यांचा फटका नेटला लागल्याने तो वाया गेला. नंतर सात्विकच्या चुकीमुळे तैवानी जोडीला तिसरा गेमपॉईंट मिळाला. पण भारतीय जोडीने तो वाचवला. सात्विक-चिरागने गेमपॉईंट मिळविला, त्यावेळी तैवानी जोडीने नेटला फटका मारला व अंनतर सात्विक-चिरागने आणखी एक गुण घेत हा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सात्विक-चिरागने 7-4 अशी आघाडी घेतली आणि ब्रेकनंतर ही आघाडी कायम राखत 18-15 अशी बढत घेतली आणि दोन शानदार स्मॅशचे फटके मारत गेमसह सामना संपवला. महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्यांना इंडोनेशियाच्या एफ. कुसुमा व एस. पुस्पितासरी यांच्याकडून 10-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, आयुष शेट्टी व अन्य भारतीयांची सुरुवात बुधवारी होणार आहे.