सात्विक-चिराग दुसऱ्या फेरीत, अॅक्सलसन पराभूत
वृत्तसंस्था/बर्मिंगहॅम
2025 च्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना डेन्मार्कच्या जोडीचा पराभव केला. या स्पर्धेत डेन्मार्कचा माजी टॉपसिडेड बॅडमिंटनपटू व्हिक्टर अॅक्सलसनचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. ट्रेसा आणि गायत्री यांनी महिला दुहेरीत विजयी सलामी दिली. पुरुष दुहेरीच्या खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताची टॉपसिडेड जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी डेन्मार्कच्या डॅनियल लुंडगार्ड आणि मॅड्स व्हेस्टरगार्ड यांचा 21-17, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 40 मिनिटे चालला होता. आता सात्विक आणि चिराग यांचा पुढील फेरीतील सामना चीनच्या झी आणि झेंग यांच्याशी होणार आहे.
पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा पुढील फेरीतील सामना इंडोनेशियाच्या जोनाटेन ख्रिस्टीशी तर महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडचा पुढील फेरीतील सामना जपानच्या तृतिय मानांकित अॅकेनी यामागुची बरोबर होईल. पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांचे एकेरीत आव्हान यापूर्वी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात डेन्मार्कचा माजी टॉपसिडेड व्हिक्टर अॅक्सलसनचे आव्हान तैवानच्या लीन चुन यी याने संपुष्टात आणले. लीनने अॅक्सलसनचा 21-19, 13-21, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील हा सर्वात निकालाचा अनपेक्षित धक्का आहे. दक्षिण कोरियाची टॉपसिडेड अॅन यंगने चीनच्या गेओ फेंगजीचा 21-16, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव केला.
महिला दुहेरीमध्ये भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी विजयी सलामी देताना चीन तैपेईच्या युन आणि हुई यांचा 21-17, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव केला. मात्र भारताच्या के. प्रिया आणि श्रुती मिश्रा यांना मात्र पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. द. कोरियाच्या बेक ना आणि ली ही यांनी प्रिया आणि श्रुती यांचा 21-9, 21-4 असा पराभव केला. त्याच प्रमाणे मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा क्रेस्टोचे आव्हान संपुष्टात आले. थायलंडच्या रुतेनापेक आणि जेनीच्या यांनी तनिषा आणि त्याच्या साथीदाराचा 21-17, 21-14 असा पराभव केला.