कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सात्विक, राजसी व तामसी तप

06:47 AM Jul 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय अकरावा

Advertisement

बाप्पा म्हणाले, तपाचे कायिक, वाचिक, आणि मानसिक असे तीन प्रकार आहेत. त्यापैकी मानसिक तप सगळ्यात श्रेष्ठ आहे कारण आपल्या सर्व हालचाली आपल्या मनात येणाऱ्या विचारातून ठरवल्या जातात. वर्तणूक चांगली ठेवण्यासाठी मनाला ऋजुता, शौच, ब्रह्मचर्य व अहिंसा यांचे महत्त्व पटायला हवे, तसेच दुसऱ्याचे मन दुखावण्यासारखे बोलायचे नाही, ह्याचाही निश्चय मनानेच करायचा आहे. त्यासाठी अनावश्यक बोलणे कसे टाळायचे हेही मनच ठरवू शकते. ह्या सर्व गोष्टी घडून येण्यासाठी कोणतीही कृती करण्यापूर्वी योग्यायोग्यतेचा विचार मनात प्रथम यायला हवा. अर्थात आपल्या मनावर आपल्या पूर्वजन्मीच्या कृत्यांचे संस्कार असतात त्यामुळे मनाचा मूळ स्वभाव आधी निष्प्रभ करायला हवा. मग त्यावर वरील विचारांचे परिणाम होऊ लागतात. मुळात मनुष्य सात्विक, राजस किंवा तामस प्रकृतीचा किंवा स्वभावाचा असतो व त्यानुसार त्याच्याकडून आचरण घडते. त्याप्रमाणे वागत गेल्यास काय काय घडू शकते त्याबाबत बाप्पा पुढे सांगत आहेत.

Advertisement

अकामतऽ श्रद्धया च यत्तपऽ सात्त्विकं च तत् ।

ऋध्यै सत्कारपूजार्थं सदम्भं राजसं तपऽ ।।5।।

अर्थ- फलेच्छारहित व श्रद्धापूर्वक जे तप ते सात्त्विक तप होय. समृद्ध होण्याच्या इच्छेने, सत्कार व मान यांच्या उद्देशाने व दंभयुक्त तप केले जाते ते राजस तप होय.

विवरण- कायिक, वाचिक तपाबाबत बाप्पांनी सांगितलं त्यातील आदर्श वर्तणूक, बोलणं चालणं कसं असावं हेही आपण समजून घेतलं व त्यानुसार स्वभावात काय बदल करायला हवा हे लक्षात घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. तत्पूर्वी मूळ स्वभावानुसार वागत गेल्यास मनुष्य कसा वागतो हेही बाप्पा सांगत आहेत. ज्याची वर्तणूक, बोलणं चालणं आदर्शवत आहे तो मनुष्य सात्विक असतो. साहजिकच तो करत असलेले वर्तन, वागणूक सात्विक तप या सदरात मोडते. कर्मफळाची अपेक्षा न करणे, सश्रद्धता, निरपेक्षता ही या विचारसरणीची, वागणुकीची वैशिष्ट्यो असतात. या तपामुळे आत्मज्ञान व मोक्षप्राप्ती अशी कायम टिकणारी फळे मिळतात.

राजस तप करणारी व्यक्ती सतत देहाला सुख वाटेल अशा कर्मफळाची अपेक्षा ठेऊन वागत असते. त्याची सर्व धडपड मानसन्मान मिळवण्यासाठी चालू असते. साहजिकच त्याच्या तपामध्ये दिखाऊपणा, दांभिकता पुरेपूर भरलेली असते. त्याच्या मनात एक वेगळंच असतं. ते आतल्याआत दाबून ठेऊन तो वरवर दाखवण्यासाठी चांगली कृत्ये करत असतो पण हेतू चांगला नसल्याने ते सर्व वाया जाते. यात कुठेही ईश्वराला जम्यातच धरलेले नसते. परिणामी अशा व्यक्तीच्या जन्ममृत्युच्या येरझाऱ्या चालूच राहतात. पुढील श्लोकात बाप्पा तामस तपाबाबत सांगत आहेत.

तदस्थिरं जन्ममृती प्रयच्छति न संशयऽ ।

परात्मपीडकं यच्च तपस्तामसमुच्यते ।। 6।।

अर्थ- राजस तप अस्थिर आहे व जन्ममृत्यु देते यात संशय नाही. जे दुसऱ्याच्या अंत:करणास पीडा देते त्याला तामस तप म्हणतात.

विवरण- राजस तप करणारा मनुष्य स्वत:च्या स्वार्थासाठी सर्व कर्मे करत असतो. यामुळे तो दुसऱ्याचे धन लुबाडत असतो पण इतरांना इजा होईल असे काही करत नाही. तामस तप करणारा हट्टाने स्वत:ला पीडा करून घेतो. स्वत:ची व इतरांची शारीरिक हानी होईल असे वागत असतो. हे तप हट्टाने केले जाते. ते करणाऱ्यालाही पीडा होते आणि पाहणाऱ्यालाही कष्ट होतात. यात कुणाचेही हित न होता दुसऱ्याला मुळापासून उखडून टाकायची इच्छा असते. या तपाला कुठलाही शास्त्राrय आधार नसतो.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article