सात्विक भक्ती
अध्याय दहावा
ईश्वराला न मानता, त्याला न जुमानता मीच काय तो सर्वेसर्वा आहे असं मानणारे स्वत:च स्वत:चा विनाश ओढवून घेतात. सर्व षड्रिपु त्यांना त्यांचे गुण त्यांना चिकटलेले असतात आणि त्यांची जोपासना करण्यात ते हयात घालवतात. याप्रमाणे असुरी संपत्ती बाळगणाऱ्या दुष्ट लोकांच्याबद्दल सांगून झाल्यावर बाप्पा म्हणतात, वरेण्या, ईश्वरप्राप्तीसाठी प्रेम आणि भक्तीची आवश्यकता असते. बेगडी प्रेम करणारे म्हणजे आपलं काम साधण्यापूरते प्रेम करणारे समाजात पुष्कळ आढळतात. स्वार्थ साधला की, त्यांचं प्रेम संपुष्टात येतं पण भक्तीत निरपेक्ष प्रेम करण्याची गरज असते. दैवी स्वभावाचा मनुष्य ईश्वरावर निरपेक्ष प्रेम करत असतो. त्याला सर्वत्र ईश्वराचं अस्तित्व जाणवत असतं. त्यामुळे तो सर्वांवर निरतिशय प्रेम करत असतो. असं सर्वांच्यावर निरपेक्षपणे, निरतिशय प्रेम करणं हा भक्तीचा सर्वोच्च प्रकार आहे. अशी भक्ती फार दुर्लभ असल्याने, तू अशी भक्ती करणारा हो, पण असा भक्त होणे सोपे नाही. त्यासाठी आसक्ती सोडावी लागते. या आसक्तीतून मनुष्याला सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा घडाव्यात असं वाटू लागतं आणि त्या तशा घडल्या नाहीत तर तो नशिबाला किंवा ईश्वराला बोल लावतो, म्हणतो माझ्या ते नशीबातच नव्हतं किंवा देवाची इच्छा नव्हती म्हणून मला अमुक एक मिळालं नाही.
याउलट जो आसक्तीविरहित असतो तो म्हणतो मला योग्य वाटले तेव्हढे प्रयत्न मी केले आता तू करशील ते मला मान्य आहे. मला हवंय तसं घडणं माझ्या हिताचं असेल तर घडवून आण, नसेल तर नाही घडलं तरी चालेल. मी माझा सर्व भार तुझ्यावर सोपवलेला आहे कारण कर्ता करविता तूच आहेस. या भावनेने जो ईश्वरावर प्रेम करतो तीच खरी भक्ती! ईश्वरही त्याच्यावर प्रसादरूपाने प्रेम करतात. जो आसक्तीतून मुक्त होतो त्याला अमुक एक घडावं किंवा अमुक एक घडू नये असं वाटतच नसतं. त्यामुळे तो संसारिक विवंचनेतून मुक्त होतो. मग भले तो संसार करत असला तरी बिघडत नाही. संसारात घडणाऱ्या घटना तो त्रयस्थपणे पहात असतो. अशाप्रकारे संसारातून विरक्त झाल्यामुळे ईश्वराच्या दर्शनाची दारे त्याला खुली होतात. ज्याप्रमाणे एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याप्रमाणे संसारात आसक्त असल्याने ज्याला संसारातून अपेक्षा असतात, त्याला विरक्ती येऊ शकत नाही. जोपर्यंत विरक्ती येत नाही तोपर्यंत ईश्वरावर निरपेक्ष प्रेम करता येत नाही. त्यामुळे निरपेक्ष प्रेमातून जी भक्ती केली जाते त्याला भक्त मुकतो, परिणामी त्याला ईश्वरप्राप्ती होत नाही. ईश्वरप्राप्तीसाठी माणसाने दैवी गुणांचा अभ्यास करून त्याच्या स्वभावातील त्रुटी हेरून त्या दूर करायचा प्रयत्न करावा. दैवी गुणांनी परिपूर्ण मनुष्यच ईश्वर प्राप्तीची योग्यता बाळगून असतो. पुढील श्लोकात बाप्पा भक्तांचे प्रकार सांगत आहेत.
सापि भक्तिस्त्रिधा राजन्सात्त्विकी राजसीतरा
यद्देवान्भजते भक्त्या सात्त्विकी सा मता शुभा ।।19 ।।
अर्थ- हे राजन, भक्ति सात्त्विक, राजस आणि तामस अशी तीन प्रकारची असते. देवाची भक्ति ही शुभ भक्ति असून तिला सात्विक भक्ती म्हणतात.
विवरण- देवभक्ती करणे हे शास्त्रानुसार सात्विक भक्तीचे लक्षण आहे. राजस लोक यक्ष वा राक्षसांचे अनुयायी होऊन मोठी शक्ती संपादन करतात तर तामसी लोक भूत, प्रेत इत्यादिकांची भक्ती करतात.
सात्विक वृत्तीच्या भक्तांच्या विचारांना योग्य तो आकार आलेला असतो. त्यांची ईश्वराप्रति असलेली श्रद्धा व त्यातून ईश्वराबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून निर्माण होणारी भक्ती निरपेक्ष असते. मोह, लोभ, क्रोध आदि विकारांनी होणारे नुकसान त्यांना माहीत असल्याने, विकार त्यांना त्यांच्या मार्गावरून ढळू देणार नाहीत, याबाबत ते दक्ष असतात.
क्रमश: