सात्विक व राजस ज्ञान
अध्याय अकरावा
बाप्पा म्हणाले, मनुष्य निरनिराळ्या प्रसंगात दान देत असतो. गरजू व्यक्तीला केलेले दान निरपेक्षतेने केलेले असेल तर त्याला सात्विक दान असे म्हणतात. देवालय, विद्यालय, औषधालय, अन्नदान अशा ठिकाणी कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलेल्या दानाला परम कल्याणकारी दान म्हणतात. दानातून मिळणाऱ्या फळाच्या आशेने किंवा नावलौकिक मिळावा, समाजात मान वाढावा या अपेक्षेने जे दान केले जाते ते राजस दान होय. घरच्यांच्या आग्रहाला बळी पडून इच्छा नसताना केलेले दान ह्याच सदरात मोडते. असे दान देताना ते स्वखुशीने दिलेले नसल्याने दान करणाऱ्याच्या मनाला क्लेश होत असतात. अपात्री, अकाली, घेणाऱ्याचा अपमान करून, त्याला तुच्छ लेखून दिलेले दान हे तामस दान होय. दानाचे तीन प्रकार सांगून झाल्यावर सध्या आपण अभ्यासत असलेल्या
ज्ञानं च त्रिविधं राजन्शृणुष्व स्थिरचेतसा । त्रिधा कर्म च कर्तारं ब्रवीमि ते प्रसंगतऽ ।। 10।। ह्या श्लोकात बाप्पा ज्ञानाचे तीन प्रकार सांगत आहेत. त्यानुसार प्रत्येकाला निरनिराळ्या कर्माच्या प्रेरणा स्वभावातून मिळत असतात. यातूनच ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार पहायला मिळतात. पुढील श्लोकात बाप्पा सात्विक ज्ञानाची माहिती देत आहेत.
नानाविधेषु भूतेषु मामेकं वीक्षते तु यऽ ।
नाशवत्सु च नित्यं मां तज्ञानं सात्विकं नृप ।। 11।।
अर्थ- हे नृपा, नानाविध भूतांचे ठिकाणी जो मला एक रूपाने स्थित असा पाहतो आणि नाशयुक्त वस्तूंच्या ऐवजी, नित्य असलेल्या मला जाणतो त्याचे ज्ञान सात्विक ज्ञान होय.
विवरण- ईश्वराच्या परब्रह्म स्वरूपाची ओळख करून घेणे हे अध्यात्मशास्त्रानुसार माणसाच्या जीवनाचे परमोच्च ध्येय होय. त्यासाठी आत्मज्ञानाची गरज असते. हेच सात्विक ज्ञान होय. ज्याप्रमाणे सोन्याच्या निरनिराळ्या दागिन्यात सोने असतेच किंवा मातीच्या निरनिराळ्या आकाराच्या भांड्यात माती हाच मुख्य घटक असतो. त्याप्रमाणे सर्व सजीव व निर्जीव वस्तूत ईश्वराचं अस्तित्व हेच प्रमुख असतं हे सर्वांना माहीत आहे पण माणसाच्या समोर दागिने आले की, त्यातील नक्षी त्याचे लक्ष वेधून घेते किंवा मातीच्या भांड्याच्या आकारातच तो रमतो पण याच्याही पलीकडे जाऊन जो त्यातील ईश्वरी अस्तित्व शोधतो तो आत्मज्ञानी असतो. ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं त्याची त्यानुसार वर्तणूक होत असते. असे आत्मज्ञान जन्मोजन्मीच्या साधनेतून मिळते. अशी व्यक्ती त्याच्या निरपेक्ष वर्तणुकीमुळे पाप पुण्याच्या संचयातून मुक्त होते व मृत्यूनंतर तिचा उद्धार होतो. सात्विक ज्ञान असलेली व्यक्ती सर्वांना ईश्वरस्वरूपात पहात असते कारण माणसं जरी वेगवेगळी दिसत असली तरी ती त्या व्यक्तीच्या दृष्टीने ईश्वराचीच विविध रूपे असतात. पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, राजस ज्ञानामुळे प्रत्येक व्यक्तीत भेदभाव केला जातो.
तेषु वेत्ति पृथग्भूतं विविधं भावमाश्रितऽ ।
मामव्ययं च तज्ञानं राजसं परिकीर्तितम् ।। 12।।
अर्थ- व्ययरहित अशा मला त्यांचे ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या स्थितीचा आश्रय करून पृथक् राहिलेला असे जो जाणतो त्याच्या ज्ञानाला राजस ज्ञान म्हणतात.
विवरण-राजस ज्ञान व्यक्तिव्यक्तीत भेदभाव करायला शिकवते. दागिन्यातील सोन्यापेक्षा नक्षीला जास्त महत्त्व दिले की, त्यातील मुख्य घटक असलेल्या सोन्याचा विसर पडणे ही गोष्ट राजस ज्ञानामुळे घडते. राजस ज्ञान वस्तूवस्तुत, माणसामाणसात भेदभाव करायची शिकवण देते. त्यामुळे त्याच्यातील मुख्य घटक असलेल्या ईश्वरीतत्वाचा विचार मागे पडतो. राजस ज्ञानामुळे मनुष्य स्वत:ला देवापेक्षा वेगळा समजतो.
क्रमश: