सात्विक व राजस दान
अध्याय अकरावा
या अध्यायाच्या सुरवातीला बाप्पांनी कायिक, वाचिक व मानसिक तप यातील फरक सांगितला. कायिक तपामध्ये ऋजुता, पवित्रता, ब्रह्मचर्य व अहिंसा याचं पालन करायला सांगितलं. त्यात चूक होऊ नये म्हणून नेहमी गुरु, ज्ञानी, ब्राह्मण आणि देव हे कसे वागतात त्याचे निरीक्षण करायला सांगितले. साधकावर आलेला प्रसंग त्यांच्यावर आला असता तर ते कसे वागले असते याचा अभ्यास करायला सांगितला. वाचिक तपामध्ये समोरच्याला न दुखवता, खरं बोलायला सांगितलं तर मानसिक तपामध्ये माणसाने त्याच्या हातून निरपेक्षपणे लोककल्याणकारी कार्ये कशी होतील याबाबत दक्ष रहायला सांगितलं. सत्वगुणी माणसाच्या हातून सत्कार्ये सहजी घडत असतात. रजोगुणी मनुष्य प्रयत्नवादी असतो. म्हणून त्याने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सत्कार्ये करण्याचा प्रयत्न करावा. तमोगुणी मनुष्याला राग, क्रोध लगेच येतो. त्याचा उपयोग करून घेऊन जर आपली वागणूक चुकीची होऊ लागली, तर आपला आपल्यालाच राग यावा व त्यातून वागणुकीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत रहावा. थोडक्यात आपल्याला मिळालेल्या त्रिगुणात्मक स्वभावातून लोककल्याणकारी कार्ये निरपेक्षपणे करण्यासाठी उपयोग कसा होईल हा विचार सतत मनामध्ये असावा. म्हणजे आपोआप आपली वर्तणूक त्याला साजेशी होत राहील. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे माणसाने स्वत:मध्ये अमुलाग्र बदल घडवून आणून आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याचा उत्तम योग प्रत्येकाने साध्य करावा. कायिक, वाचिक व मानसिक हे तपाचे स्थूल प्रकार झाले. पुढे माणसाच्या मूळ स्वभावानुसार तो कसा वागू शकतो हे त्यांनी सात्विक, राजस आणि तामस तपाच्या विवरणातून सांगितले पण माणसाची प्रत्येक कृती सात्विकच व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. मनुष्य निरनिराळ्या प्रसंगात दान देत असतो. पुढील श्लोकातून ते त्याचे सात्विक, राजस व तामस हे फरक स्पष्ट करत आहेत.
विधिवाक्यप्रमाणार्थं सत्पात्रे देशकालतऽ ।
श्रद्धया दीयमानं यद्दानं तत्सात्त्विकं मतम् ।। 7 ।।
अर्थ- विधिवाक्यांच्या प्रामाण्याकरिता सत्पात्री, देश आणि काल यांना अनुसरून श्रद्धापूर्वक जे दान दिले जाते त्याला सात्विक दान म्हणतात.
विवरण- विधीवाक्यांना प्रमाण मानणे म्हणजे शास्त्रात सांगितल्यानुसार वागणे होय. गरजू व्यक्तीला केलेले दान सत्पात्री दान असते. त्यात ते तिर्थस्थळी, चांगल्या मुहूर्तावर, निरपेक्षतेने केलेले असेल त्याला सात्विक दान असे म्हणतात. दुसऱ्याची गरज आणि योग्यता पाहून त्याला मदत करणे हा दान करण्यामागचा उद्देश आहे. बहुजनहिताय, बहुजनसुखाय अशी काही दाने दिली जातात. उदाहरणार्थ देवालय, विद्यालय, औषधालय, अन्नदान अशा ठिकाणी कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलेले दान परम कल्याणकारी दान म्हणतात. अशा प्रकारच्या दानाने ईश्वर प्रसन्न होतो. अनेक राजे दानामुळे श्रेष्ठत्वाला पोहोचलेले आहेत. राजा हरिश्चंद्र, राजा बळी, राजा शिबी ही त्यातली प्रमुख उदाहरणे आहेत. आता शास्त्राला धरून नसलेल्या राजस दानाबद्दल बाप्पा पुढील श्लोकातून सांगत आहेत
उपकारं फलं वापि काक्षद्भिर्दीयते नरैऽ
क्लेशतो दीयमानं वा भक्त्या राजसमुच्यते ।।8।।
अर्थ- उपकार अथवा फल यांची अकांक्षा करणाऱ्या मनुष्यांकडून भक्तियुक्त अथवा क्लेशयुक्त जे दान दिले जाते त्याला राजस दान म्हणतात.
विवरण- मी समाजाचं काही देणं लागतो हा विचार मनात ठेवून आपल्या उत्पन्नापैकी काही भाग कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वेछेने दान केले तर ते सात्विक दान होय परंतु काही लोक त्यांचा त्या दानातून होणारा पुढील फळाच्या आशेने किंवा नावलौकिक मिळावा, समाजात मान वाढावा या अपेक्षेने दान करतात ते राजस दान होय.