For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्संग आणि एकांतवास

06:43 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
सत्संग आणि एकांतवास
Advertisement

हाथरसमध्ये सत्संगादरम्यान प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरी होऊन सुमारे सव्वाशे जणांचे प्राण गेले आहेत. सत्संग आयोजक भोले बाबा सत्संगादरम्यान सव्वाशे जणांचे प्राण घालवून एकांतवासात गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण, हे एकांतवास स्थळ देशी की विदेशी कळलेले नाही. लोकसंख्या प्रचंड आहे. भोळेभाबडे अनेक आहेत. त्यांच्या अंधश्रद्धेचा लाभ घेत अनेक धर्मातील बाबा, फकीर, स्वामी, माँ, बहन त्यांना लुबाडत असतात आणि प्रचंड गर्दी करवून हे बाबा आपले दुकान व दहशत व प्रभाव वाढवत असतात. राजकारणाचा मतपेटीशी आणि गर्दीशी संबंध असल्याने सारेच राजकारणी गर्दीला शरण जातात आणि कशाचाच कुणाला धरबंध न उरल्याने सामान्यजन अंधश्रद्धेत फरफटवले जातात. जीवाला मुकतात. एक जुलैपासून देशात स्वदेशी दंड संहिता लागू झाली आहे. त्यामध्ये अशा अपराध्याला काय शिक्षा आहे हे बघावे लागेल. पण, अनियंत्रीत, लोकांचे बळी घेणारी आणि जनतेला वेठीस धरणारी गर्दी करण्यावर निर्बंध असले पाहिजेत. व्यवहारज्ञानात सुखी सोनाराकडे आणि दु:खी ज्योतिषाकडे, महाराजाकडे जातो असे म्हटले जाते. संत तुकारामांपासून गाडगेमहाराजापर्यंत सर्वांनी अंधश्रद्धा आणि अज्ञान यावर प्रहार करत शहाणे व्हा, जागे व्हा, कर्म हीच खरी पूजा आहे वगैरे सांगितले आहे. सारे संत वाङ:मय तेच सांगते. पण, सारे दु:खी कष्टी हे भविष्य बाबा, गंडा, दोरा यांच्या नादी लागतात आणि संकटातून महासंकटात ढकलले जातात. हाथरसची चेंगराचेंगरी हा काही पहिला अपघात नव्हे आणि शेवटचाही नाही अशा दुर्घटना दरवर्षी घडतात. सर्व धर्मात घडतात. त्याचबरोबर गर्दी जमवण्याची इर्षा असलेल्या प्रत्येक क्षेत्रात होतात. यामध्ये महिला लहान मुले आणि वृद्ध यांचे बळी जातात आणि जे भरपूर आहे  त्यांची किंमत वा कदर केली जात नाही. त्याप्रमाणे सुमारे दीडशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात शंभर दोनशे वा अधिक माणसे चेंगरून मेली तर त्यांची कुणी मनापासून फारशी चिंता करत नाही. श्रद्धांजली वाहून मदतीचे चेक अंगावर टाकून मंडळी हात झटकून मोकळी होतात आणि बुवा वगैरे पळून जातात. या प्रकारांचा दोष द्यायचा तर तो अशा महागर्दीला हजेरी लावणाऱ्यांना प्रथम दिला पाहिजे आणि मग संयोजकांना, प्रशासनाला दिला पाहिजे. जग ज्ञान, तंत्रज्ञान यामध्ये पुढारलेले आहे. घरबसल्या छोट्या पडद्यावर वा हातातील स्मार्ट फोनवर आपण हवे ते दाखवू पाहू शकतो. त्यांचा खर्चही कमी आहे. परवा भारताने क्रिकेटचा टी ट्वेंटीचा जागतिक कप जिंकला, कोट्यावधी भारतीयांनी मध्यरात्रीपर्यंत जागून छोट्या पडद्यावर त्याचा आनंद लुटला व फटाके फोडत आतषबाजी केली. खरे तर तंत्रज्ञान लक्षात घेता कोणते थेट प्रसारण किती लोक बघत आहेत आणि काय कॉमेंट करत आहेत हे समजणे अवघड उरलेले नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय सभा असोत वा धार्मिक सत्संग वा प्रवचने ही ऑनलाईन बघणे संयुक्तिक आहे. त्यासाठी पगारी माणसे वा भोळे भक्त जमवून पाशवी सभा, सत्संग वा यात्रा करणे गैर वाटते. काळानुरूप सर्वच क्षेत्रात बदल होत आहेत. आपणही बदलले पाहिजे आणि समाजहिताच्या बदलासाठी आग्रही राहिले पाहिजे. जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या वेळी पर्यटन स्थळी होणारी गर्दी ही सुद्धा धोकादायक आहे. हाथरस हे उत्तर प्रदेश मधील एक नगर आहे आणि हरिबाबा हे त्या राज्यासह आजुबाजूच्या राज्यात पसरले आहेत. अनेक महाराज व त्यांचे संघटन प्रचार, प्रसार हे एखाद्या कार्पोरेट कंपनीसारखे बलाढ्या व तगडे असते. त्यांचे अनुयायी हवे ते काम करतात आणि त्यामध्ये मोठा अर्थव्यवहार व संघटन असल्याने त्याकडे यंत्रणेचे सोईने दुर्लक्ष असते. हाथरसमध्ये सुमारे एक लाख भाविक जमले होते. सत्संग आटोपून हे हरिबाबा बाहेर पडत असताना गाड्या जाण्यासाठी वाट अडविली गेली. दरम्यान उतावीळ जमाव व अनियंत्रीत गर्दी यांची चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये बालके, महिला, वृद्ध असे सव्वाशे मंडळी चेंगरून मेली. अनेक जण जखमी झाले. त्या परिसरात इतक्या संख्येला उपचार करण्यासाठी डॉक्टर, दवाखाने, औषध ही यंत्रणा नव्हती. मृत्यूचे तांडव सुरू होते आणि हरिबाबा पळून गेले होते. खरे तर हिंदु धर्मात एकांतात, गुहेत किंवा हिमालयात जाऊन तप, ध्यान, धारणा केली जात असे. पण, आता सारेच महा, भव्य आहे. महाआरती, महापूजा, महामेळावा, महासत्संग यामागचे उद्दिष्ट हे प्रदर्शनाचे असते आणि त्यावर चाप लावला पाहिजे. लोकांच्या जीवाची, कल्याणकारी व्यवस्थेची जबाबदारी संयोजकांपासून सरकारपर्यंत सर्वांनी घेतली पाहिजे. तसे झाले नाही तर चेंगराचेंगरी, उष्माघात व प्रवासा दरम्यान मोठे अपघात घडून अनेक बळी जातात. क्षणभर हळहळ व्यक्त होते, आरोप, प्रत्यारोप होतात. राजकारण केले जाते आणि मग येरे माझ्या मागल्या असे प्रकार घडतात. ओघानेच गर्दीवर नियंत्रण हवे. अनेक शहरात जवळजवळ असलेल्या शाळा एकाच वेळी सुटणार नाहीत याची जशी काळजी घेतली पाहिजे, कार्यालयातील वेळा लक्षात घेऊन रस्ते वाहतूक आखली पाहिजे तसे मोठे कार्यक्रम मोठ्या सभा घेताना गर्दीवर नियंत्रण राहिल असे नियोजन आवश्यक असते. त्यासाठी पूर्वतयारी हवी, सभा संपल्यावर बाहेर पडण्यासाठी एक एक कंपार्टमेंटमधील माणसे सोडली पाहिजेत. वाहन तळ आणि तेथून निघणारी वाहने यावर नियंत्रण हवे. वाटेत रस्त्यात धाबे, हॉटेल्स आदी ठिकाणी हुल्लडबाजी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि गर्दी सुखरूप घरी परतेल याची चिंता सर्वांनीच केली पाहिजे. सरकार कुणाचेही असो मुख्यमंत्री कुणीही असो त्याने मतपेटीचा विचार न करता लोककल्याण व सामाजिक शिस्त यावर भर देत प्रसंगी कठोर निर्णय घेतले पाहिजेत. असे गुन्हे पचले की गुन्हेगार सराईत होतात. गर्दीची दहशत निर्माण करत सरकारला नमवतात. लोकांना लुटतात असा हा सत्संग निरूपयोगी आहे आणि पळून जाऊन एकांतवास साधणे ही गुन्हेगारी आहे. हे लक्षात घेतले पाहिजे व त्यावर कायद्याने नियमाने तर बंधन घातलेच पाहिजे. जोडीला लोकशिक्षणही केले पाहिजे. हाथरसमधून इतका जरी धडा घेतला तरी पुरे आहे. आता या हरिबाबाची सारी लफडी भानगडी बाहेर येतील तेव्हा सर्वांच्या डोक्यात प्रकाश पडेल पण, तेव्हा खूपच उशीर झाला असे म्हणावे लागेल. लोकांनी शहाणपणा शिकला पाहिजे आणि असे जे गर्दीचे, शक्तीचे प्रयोग आहेत त्यापासून दूर राहिले पाहिजे. त्यातच सार्वहित आहे. नाहीतर सत्संग व एकांतवास आणि महागर्दीतील चेंगराचेंगरीत बळी अटळ आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.