सतीश शुगर्स शरीरसौष्ठव स्पर्धा जानेवारीत
बेळगाव : सतीश जारकीहोळी फाऊंडेशन आयोजित 12 वी सतीश शुगर्स क्लासिक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा सोमवार दि. 19 जानेवारी 2026 रोजी गोकाक येथील वाल्मिकी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या पत्रकांचे अनावरण यमकनमर्डी येथे करण्यात आले.यमकनमर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते पत्रकांचे अनावरण करण्यात आले. जिल्हा आणि राज्यातील शरीरसौष्ठवपटूंनी स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 55, 60, 65, 70, 75, 80, 85 व 85 वरील तसेच राज्यस्तरीय स्पर्धा 55 ते 100 किलो वजनी गटात घेतली जाणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्याना अनुक्रमे 15000, 10000, 9000, 8000 व 7000 हजार रुपये अशी बक्षिसे, प्रमाणपत्रे व पदके देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय क्लासिक विजेत्याला 1 लाख 50 हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र तर पहिल्या विजेत्याला 1 लाख रुपये, दुसऱ्या उपविजेत्याला 50 हजार रोख व चषक असेच उत्कृष्ट पोझरला 10 हजार रुपये रोख व चषक देवून गौरविण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय शरीरसौष्ठव क्लासिक स्पर्धेसाठी पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे 20000, 15000, 14000, 13000 व 12000, पदके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर सतीश शुगर्स क्लासिक विजेत्या स्पर्धकाला 2 लाख रोख, आकर्षक चषक व मानाचा किताब तर पहिल्या विजेत्याला 1 लाख रुपये रोख, चषक, दुसऱ्या उपविजेत्याला 50 हजार रुपये रोख व चषक तसेच उत्कृष्ट पोझरसाठी 30 हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी निवड चाचणी म्हैसूर येथे 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मि. कन्नडिंगा स्पर्धेदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत पात्र होणाऱ्या स्पर्धकांनाच जानेवारीत होणाऱ्या सतीश शुगर्स क्लासिक स्पर्धेत सहभागी होता येणार आहे, असे सांगण्यात आले. पत्रक अनावरणप्रसंगी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दणावर, गणेश गुंडप, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष गंगाधर एम., रियाज चौगला, सुनील पवार, नागराज कोलकार आदी उपस्थित होते.