सतीश जारकीहोळींनी घेतली काँग्रेस अध्यक्ष खर्गेंची भेट
राजकीय वर्तुळात कुतूहल
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) कथित बेकायदा भूखंड वाटप प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. उभयतांच्या भेटीमुळे कुतूहल निर्माण झाले आहे.
मुडा प्रकरणी भाजप व निजद नेते सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. लोकायुक्त आणि ईडीकडून सिद्धरामय्यांची चौकशी होणार आहे. सिद्धरामय्यांनी राजीनामा देणार नसल्याचे ठामपणे सांगितले असले तरी हायकमांडच्या सूचनेवरून त्यांना पद सोडावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे लपून राहिलेले नाही.
शुक्रवारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तासभर चर्चा केली. उभय नेत्यांमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते. एखाद्या वेळेस सिद्धरामय्यांना राजीनामा द्यावा लागला तर मुख्यमंत्रिपद अनुसूचित जाती किंवा जमातीच्या नेत्याला मिळायला हवे. यासाठी आम्ही एकजूट दाखविणार असल्याची चर्चाशी खर्गेंसोबत झाल्याचे समजते. अलीकडे दलित समुदायातील नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर जारकीहोळींनी खर्गेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काँग्रेसमधील नेते आणि सर्व मंत्र्यांनी मुडा प्रकरणात आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आहे. हा संदेशही सतीश जारकीहोळींनी खर्गेंपर्यंत पोहोचविला असणाची शक्यता आहे.
अनावश्यक चर्चेची गरज नाही : सिद्धरामय्या
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याविषयी प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या म्हणाले, एआयसीसीचे अध्यक्ष खर्गे यांची सतीश जारकीहोळींनी भेट घेणे चुकीचे नाही. अनावश्यक चर्चा करण्याची गरज नाही, असे सांगितले.