कोनवाळ गल्लीतील ई-आस्थी नोंदणी कक्ष सुरू झाल्याने समाधान
‘तरुण भारत’ वृत्ताची घेतली दखल
बेळगाव : कोनवाळ गल्लीतील बेळगाव वन केंद्रात शहरातील मिळकतधारकांसाठी ई-आस्थी नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे काही दिवसांपासून ई-आस्थी नोंदणी केंद्र बंद ठेवण्यात आले होते. याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच बंद ठेवण्यात आलेले ई-आस्थी नोंदणी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शहरातील मिळकतींना महानगरपालिकेकडून ई-आस्थी प्रणालीअंतर्गत ए व बी खाता दिला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्व बेळगाव वन केंद्रांमध्ये त्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या ठिकाणी एक ऑपरेटर, कॉम्प्युटर, स्कॅनर, प्रिंटर व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोनवाळ गल्लीतील बेळगाव वन केंद्रातही ई-आस्थी नोंदणीची सोय करून देण्यात आली असली तरीही तांत्रिक कारणामुळे काही दिवसांपासून ई-आस्थी नोंदणी कक्ष बंद ठेवण्यात आला होता.