दबंग दिल्लीच्या यशामध्ये साथियानची चमक
चेन्नई : येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या 2024 च्या अल्टिमेट सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत (युटीटी) जी. साथियानच्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने अॅथलिड गोवा चॅलेंजर्सचा 9-6 अशा फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील दबंग दिल्लीचा हा पहिला विजय आहे. या लढतीमध्ये पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीचा कर्णधार साथियानने अॅथलिड गोवा चॅलेंजर्स संघातील मिहाई बोबोसियाचा 8-11, 11-9, 11-9 असा 2-1 अशा गेमस्मध्ये पराभव केला. दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीच्या ओरावेन प्रेनांगने गोव्याच्या लियुचा 2-1 अशा गेम्समध्ये (11-7, 11-10, 6-11) पराभव करत आपल्या संघाची आघाडी वाढविली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात साथियान आणि प्रणांग या जोडीने अॅथलिड गोवा चॅलेंजर्सच्या हरमित आणि लियु यांचा 2-1 अशा गेम्समध्ये (11-7, 11-4, 7-11) असा पराभव केला. चौथ्या एकेरी सामन्यात दिल्ली दबंगच्या अॅन्ड्रेस लिव्हेंकोला हरमित देसाईकडून 1-2 अशा गेम्समध्ये (11-7, 8-11, 9-11), दिया चितळेने यशस्वी घोरपडेवर 2-1 अशा गेम्समध्ये (11-10, 11-6, 3-11) असा पराभव केला.