उपग्रहांचा पृथ्वीवर वर्षाव
अमेरिकेतील विख्यात उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीच्या उपग्रहांचा अलिकडच्या काळात पृथ्वीवर वर्षाव होत आहे. प्रतिदिन चार ते पाच उपग्रह पृथ्वीवर पडत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. हे उपग्रह आपल्या ‘इंटरनेट’शी संबंधित आहेत. मस्क यांच्या या कंपनीने सहस्रावधी उपग्रह अवकाशात सोडून त्यांच्या माध्यमातून इंटरनेटचे जाळे पृथ्वीवर सर्वत्र विस्तारले आहे. या उपग्रहांचे कार्यायुष्य जास्तीत जास्त पाच वर्षे असते. त्यानंतर ते पृथ्वीवर पडतात. त्यांच्यास्थानी नवे उपग्रह सोडले जातात. अंतरिक्षात सोडल्या जाणाऱ्या उपग्रहांची संख्या जसजशी वाढत जाईल, तसतशी त्यांच्या पडण्याची संख्याही वाढतच जाणार आहे, असे स्पष्टीकरण मस्क यांच्या स्पेसएक्सने दिले आहे.
उपग्रहांच्या या वर्षावासंबंधी अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. हे उपग्रह किवा त्यांचे अवशेष मानवासाठी घातक आहेत, अशी काही जणांची समजूत आहे. तसेच हे उपग्रह नेमके कोठे कोसळणार आहेत, यासंबंधी काहीही माहिती कंपनीकडून आधी दिली जात नाही, असाही अनेकांचा आक्षेप आहे. एकंदर, या उपग्रहांच्या वर्षावासंबंधात लोकांच्या मनात भीती आहे. तथापि, हे उपग्रह मानवासाठी किंवा कोणत्याही सजीवांसाठी घातक नाहीत. तसेच ते त्यांच्या अंगावर कोसळणार नाहीत, असे कंपनीच्या तज्ञांकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले गेले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार या उपग्रहांची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यांच्या कार्यायुष्य संपून ते जेव्हा पृथ्वीवर पडतील, तेव्हा पृथ्वीभोवतीच्या वातावरणाशी त्यांचे घर्षण होईल आणि ते पूर्णत: जळून जातील. त्यांचा कोणताही भाग पृथ्वीवर आदळणार नाही. त्यांची केवळ राख खाली पडेल. त्यामुळे या उपग्रहांच्या वर्षावाच्या संदर्भात ज्या नकारात्मक समजुती आहेत, त्या अत्यंत चुकीच्या आहेत. त्यांना कोणताही आधार नाही. तसेच या उपग्रहांची राख, जी पृथ्वीवर पडत आहे, ती किंचितही विषारी नाही. त्यामुळे ती पूर्णत: निरुपद्रवी आहे. हे उपग्रह त्यांचे काम संपल्यानंतर अवकाशातून पृथ्वीवर पडणार, हे गृहित धरुनच त्यांची रचना करण्यात आली आहे. ते केव्हा पृथ्वीवर पडले, हे कोणाला कळणारही नाही. त्यामुळे त्यांच्या संबंधी जी भीती व्यक्त होत आहे, ती व्यर्थ आहे. सर्वसामान्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, असे हे स्पष्टीकरण आहे.