सतेज पाटील यांचे 2 नंबरचे व्यवसाय...लवकरच भाजपमध्ये प्रवेश- राजेश क्षीरसागर
सतेज पाटील हे दोन नंबरच्या व्यवसायांमध्ये गुंतलेले असून आपले काळेधंदे लवण्यासाठी ते भाजपच्या वाटेवर असल्याची खरमरीत टिका शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे खासदार सतेज पाटील यांच्यावर केली आहे. तसेच याअगोदर आमच्यावर अन्याय झाला आता मुरलीधर जाधवांच्यावर अन्याय झाला आम्हीही तेच सांगत होतो असेही त्यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाचे सात आमदार हे भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला होता. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टिका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "सतेज पाटील हे शिवसेनेचे बोट धरून विधानसभेत गेले आहेत. त्यानंतर त्त्यांनी शिवसेनेला विसरून काँग्रेसला जवळ केले. आता शिवसेनेचे सात खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार असं ते वक्तव्य करत आहेत मात्र हे कोणते ज्योतिषी आहेत. आम्ही एक संघ आणि भक्कम असून शिवसेनेचे 18 च्यावर खासदार आम्ही निवडून आणू या उलट त्यांची अशी काही प्रक्रिया सुरू आहे का हे पाहावं लागेल. त्यामुळे आता सतेज पाटील यांची पळता भुई थोडी झाली आहे. त्यांचे सर्व व्यवसाय दोन नंबर आहेत त्यामुळे आता त्यांना काही करता येत नाही. यामुळे आपल्यालाही काँग्रेसमधून कड काढायची आहे आणि भाजपमध्ये जायचं आहे या हेतूने ते असे वक्तव्य करत आहेत."असा गौप्यस्फोट त्यांनी केला.