Satara News : साताऱ्याच्या जमियत उलेमाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात !
साताऱ्यातून माणुसकीसाठी माणुसकी उभी राहिली
सातारा : "मराठवाड्यातील महापुरामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. शेतजमिनी वाहून गेल्या, घरे कोसळली, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आणि अनेक कुटुंब बेघर झाले आहेत . या गंभीर परिस्थितीत साताराच्या जमियत उलेमा-ए-हिंद आणि खिदमत-ए-खलक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
आज साताऱ्यातून भूम-परण्डा परिसरातील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, भाजीपाला, औषधे, कपडे, ब्लँकेट्स, पिण्याचे पाणी, तसेच विशेष शैक्षणिक किटसह जीवनावश्यक साहित्याची गाडी रवाना करण्यात आली. स्त्रियांनी स्वतःचे नवीन कपडे, लहान मुलांनी बचतीचे पैसे देत मदतीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी आयोजकांनी सांगितले की, धर्म-जात न पाहता संकटग्रस्तांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हेच खरी पैगंबरांची शिकवण आहे. पुढील काही दिवसांत आणखी टप्प्याटप्प्याने मदत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्तीची घोषणाही करण्यात आली आहे." या गंभीर परिस्थितीत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन जमियत उलेमा-ए-हिंद आणि खिदमत-ए-खलक संस्थांनी माणुसकीचे उदाहरण दिले आहे..