मोबाईलचा त्रास होतोय म्हटल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यावर चाकू हल्ला
बावधन येथील प्रकार, वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा प्रतिनिधी
वाई तालुक्यातील बावधन येथील बसस्टॉपवर दहावीतले सहा मित्र गप्पा मारत होते. तेव्हा त्यांच्याच वर्गातील एक जण आला. त्याने मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावली होती. त्यास त्या सहा जणातील एकाने तुझ्याकडे हेडफोन आहे ना तो लाव, अशी विनंती केली असता त्याचा राग मनात धरुन त्याने वर्गात मारहाण केली. तेवढ्यावर तो थांबला नाही तर त्याने शाळा सुटल्यावर घरी जाताना बावधन हायस्कूलच्या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या कमानीच्या समोर अडवून त्याच्या दंडावर चाकूने हल्ला करुन जखमी केले. त्यावरुन त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वाई तालुक्यातील बावधन येथील तिकाटण्यात असलेल्या बसस्टॉपवर सहा मित्र दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 5.15 वाजता गप्पा मारत बसले होते. तेव्हा तेथे एक मुलगा आला. त्याने मोबाईलवर मोठमोठ्याने आवाज करत गाणी लावली होती. त्यास सहा जणांतील एकाने विनंती केली की तुझ्याकडे ब्लुट्रुथ आहे त्याचा वापर कर, असे सांगताच तो मुलगा त्याला म्हणाला थांब तुझ्याकडे पाहतोच असे म्हणून निघून गेला. त्यानंतर दि. 3 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता बावधन हायस्कूलमध्ये इयत्ता 10 ब च्या वर्गात असताना त्याच मुलाने विनंती करणाऱ्या मुलास मारहाण केली. तेव्हा वर्गशिक्षकांनी दोघांनाही शिक्षक रुममध्ये नेले. तेथे दोघांनाही मारामारी करु नका, अशी ताकिद दिली. त्यानंतर सायंकाळी 5.10 वाजता शाळा सुटल्यानंतर विनंती करणारा मुलगा हा त्याच्या मित्रासमवेत बावधन हायस्कूलपासून ग्रामपंचायतीकडे चालत निघाले होते. तेव्हा त्या मुलाने विनंती करणाऱ्या मुलाला ग्रामपंचायतीच्या कमानीच्या जवळ अडवून त्याच्या दंडावर चाकूने वार केला आणि तो निघून गेला. तेव्हा जखमी झालेल्या त्या मुलास त्याच्या मित्रांनी सायकलवरुन सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथून वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावरुन चाकून वार करणाऱ्या मुलावर वाई पोलीस ठाण्यात जखमी मुलाने गुन्हा दाखल केला आहे.