आता टोल नाही टोले देणार! टोलनाका प्रशासनाला स्थानिकांचा सज्जड दम
उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन
उंब्रज प्रतिनिधी
तासवडेतील टोलनाक्यावर स्थानिकांची लूट सुरू आहे. मागील आठवड्यापासून स्थानिकांनी निवेदने देऊनही टोलनाका प्रशासन नरमेची बाजू घ्यायला तयार नाही. त्यामुळे स्थानिकांची लूट थांबवण्यासाठी उंब्रज व परिसरातील शेकडो नागरिकांनी टोलनाक्यावर रविवारी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्याने टोलनाका परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. चर्चेतून स्थानिकांना समाधानकारक उत्तर टोलनाका प्रशासनाकडून मिळाले नाही. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी टोल व्यवस्थापनाला धारेवर धरले. स्थानिक संतप्त झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. ‘स्थानिकांचा टोल घ्याल तर यापुढे टोले देऊ’ असा सज्जड दम यावेळी आंदोलकांनी दिला. लेखी स्वरूपात निवेदन देऊन पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्याचा इशारा दिला आहे.
उंब्रज (ता. कराड) येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून अन्यायकारक सुरू असलेल्या टोलवसुली विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी रविवारी सकाळी अकराच्या सुमारास चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह टोल नाक्याची सातारा ते कराड जाणारी वाहतूक रोखून आंदोलन केले. टोल प्रशासनाला स्थानिकांना टोल नाक्याच्या स्थापनेपासून सुरू असणारी टोलमाफी कायम ठेवावी या मागणीचे निवेदन दिले. यावेळी ‘टोल आजपर्यंत दिला नाही, पुढेही टोल देणार नाही’ अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. टोल प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक थोरात यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत बधे तळ ठोकून होते.
तासवडे टोल नाक्यावर मागील काही दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या फास्टॅगमधून टोलची रक्कम कट केली जात आहे. टोलनाक्यावरून गेल्यानंतर सुमारे तासाभरानंतर पैसे कट झाल्याचा मेसेज येतो. अनेकदा कारसारख्या वाहनांना अवजड वाहतुकीचा दर लावून पैसे कापले जातात. तर काही वाहने टोलवर येत नाहीत. परंतु त्यांच्या अकाऊंटमधून टोलची रक्कम कट झाल्याचा मेसेज येतो. टोलवर दमदाटी केली जाते. नियमानुसार सोयी सुविधा मिळत नाहीत, यासारख्या अनेक तक्रारी यावेळी स्थानिकांनी केल्या. याबाबत 30 जून रोजी शिवसेना कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी 1 जुलै रोजी परिसरातील विविध ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन समक्ष भेटून दिले आहे. तरीही टोल प्रशासनाने स्थानिकांची टोल वसुली सुरुच ठेवल्याने उंब्रजकर रविवारी वाहनांसह मोर्चा काढून टोल प्रशासनाला जाब विचारण्यासाठी टोलनाक्यावर आले. निव्वळ निवेदन देऊन परत जाण्याची भूमिका आलेल्या लोकांची होती. मात्र टोल व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणावर लावलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे व स्थानिकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी कागदोपत्री घोडे नाचवल्याने तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी व्यवस्थापक थोरात यांना निवेदन दिले. तसेच स्थानिकांचा टोल घेवू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची विनंती केली.
यावेळी उंब्रजचे सरपंच योगराज जाधव, मार्केट कमिटी संचालक सोमनाथ जाधव, उंब्रज ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, शिवसेना कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले तसेच ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना टोल व्यवस्थापक व पोलिसांकडे व्यक्त केल्या. थोरात यांनी 13 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रश्नावर बैठक ठेवण्यात आल्याचे सांगितले. तसेच याबाबतची सर्व माहिती कोल्हापूर एनएचआय कार्यालयात दिली जाईल. शासनाने मानवरहित टोल ही संकल्पना अवलंबली असल्याने नवीन पद्धतीने टोल वसुली यंत्रणा अवलंबली असल्याने स्थानिकांचा टोल कापला जात असून याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी योग्य समन्वय काढून या अडचणीतून मार्ग काढणार असल्याची माहिती दिली.
...अन्यथा तीव्र आंदोलन करणार
टोलनाका स्थापनेपासून आजपर्यंत स्थानिकांनी टोल दिला नाही व यापुढेही देणार नाही. स्थानिकांना रोजच्या दैनंदिन गोष्टीसाठी टोलनाक्यावरून नेहमी ये-जा करावी लागत असून वाहनधारकांच्या नकळत टोल कट होत आहेत. हा अन्याय स्थानिक नागरिक कदापि सहन करणार नाहीत. शांततेत निवेदन देऊन टोल प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.
-सोमनाथ जाधव, संचालक, शेती उत्पन्न बाजार समिती कराड