गुंतवणुकीच्या नावाखाली महिला डॉक्टरची ३५ लाखांची फसवणूक; ट्रेडींग अॅपचे ट्रेनिंग देण्याच्या नावाखाली घेतले विश्वासात
शहर पोलीस ठाण्यात तिघाविरूद्ध गुन्हा दाखल
सातारा प्रतिनिधी
सोशल मीडियावरील जाहिरात पाहून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या साताऱ्यातील डॉक्टर महिलेची 35 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. जयश्री नटराज द्रविड (वय 59, रा. सदरबझार सातारा) असे डॉक्टर महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात डॉ. दिव्य माथुर, त्यांची असिस्टंट जेसिका व अनोळखी व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून महिन्यात साताऱ्यातील बालाजी क्लिनिकच्या सर्जन डॉ. जयश्री द्रविड यांनी फेसबुकवर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळण्याची जाहिरात बघितली. ही जाहिरात पाहून त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क केला. त्यानुसार डॉ. दिव्य माथूर व त्यांची असिस्टंट जेसिका यांनी माहिती देवून दहा दिवसांचे ऑनलाईन टेनिंग घेण्यास सांगितले. टेनिंगमध्ये स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची, परतावा किती मिळतो. याची माहिती मिळत गेल्याने जयश्री यांचा विश्वास संपादन करण्यात दोघांना यश आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जयश्री यांना जेसिकाने काही रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार राजस्थान व मुंबई येथील बॅँक खात्याच्या नंबरवर जयश्री द्रविड या रक्कम भरत गेल्या. जवळपास त्यांनी 35 लाख 10 हजार रुपये भरले.
मुलाने केले सावधान
जेसिका हिच्या सांगण्यावरून डॉ. जयश्री द्रविड या दिलेल्या बॅँक खात्यावर पैसे भरत होत्या. ही बाब जयश्री द्रविड यांच्या मुलाच्या लक्षात आली. त्याने पैसे भरतेय पण जरा आणखी माहिती घे असे सांगितले. त्यानंतर जयश्री द्रविड यांना संशय आला. त्यांनी राजस्थान व मुंबईच्या बॅँक खात्यावर भरत असलेले पैसे आहेत का? याची खात्री केली. तेव्हा पैसे खात्यावर नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी डॉ. माथूर व जेसिका यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बिले करत आहेत.