Satara News: पोलिसांच्या अश्रूधाराने नागरिकांचा श्वास गुदमरला
तात्पुरते आंदोलक बनलेल्यांच्या डोळ्यातून आले पाणी
सातारा : तात्पुरते आंदोलक बनलेल्या नागरिकांच्या दिशेने अश्रूधूर नळकांड्या फोडल्याने झालेला धुराचा त्रास नागरिकांना झाला. सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा आदेश मिळताच सातारा शहर पोलीस, शाहूपूरी पोलीस, वाहतूक शाखा आणि होमगार्ड हे राजवाडा बसस्थानकात दुपारी जमले.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या महिला हजेरी कर्मचारी या कर्मचाऱ्यांची हजेरी घेत होत्या. सर्व तयारी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची एन्ट्री होते. त्यानंतर त्यांना सॅल्युट करुन तेथेच कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना पोलिसांनी विनंती केल्यावर ते नागरिक आंदोलक बनले. परंतु त्यांना काहीच वेळात अश्रूधुराच्या नळकांड्याचा सामना करावा लागला.
नळकांड्या फोडल्याने त्याचा धुर नाकातोंडात गेल्याने काहींना त्रास झाला. चेहऱ्यावर जळजळ झाली. नंतर रुट मार्च पोलिसांनी काढला. गणेशोत्सव व येणाऱ्या ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात राजवाडा पसिरात रुट मार्चचे नियोजन पोलिसांच्यावतीने करण्यात आले होते.
परंतु अचानक त्यात बदल केल्याने दंगा काबू पथकाचे प्रात्याक्षिक घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. पोलीस कर्मचाऱ्यांना काहीवेळ अश्रूधूराच्या नळकांड्या कोणत्या पोलीस ठाण्यातून आणायच्या यामध्ये संभ्रम झाला होता. परंतु तेथे कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुचित करताच अश्रूधुराच्या नळकांड्या पोहोचल्या. कर्मचाऱ्यांनी अश्रूधरांचे नळकांडे रिक्षाथांब्याच्या दिशेने टाकले. त्याचा धुर काहींच्या नाकातोंडात गेला. त्यामुळे डोळ्यातून पाणी आले.
चेहऱ्यांची जळजळ झाली. श्वास गुदमरला, असा त्रास झाल्याने पोलिसांच्या या रंगीत तालिमीबाबत नाराजी व्यक्त केली.दरम्यान, त्यानंतर रुट मार्च काढण्यात आला. हा रुटमार्च गोल बागेला वळसा मारुन मोती चौकातून पुढे देवी चौक, कमानी हौद, शेट्यो चौक, पाचशे एक पाटी, पुन्हा मोती चौकातून राजवाडा बसस्थानकात समारोप करण्यात आला.
प्रवाशांचीही झाली गैरसोय
राजवाडा बसस्थानकात बसेससाठी थांबलेल्या प्रवाशांना तब्बल तासभर आपली बस येईल काय यामुळे इकडे की तिकडूनच जाईल याची भीती होती. त्यातच होमगार्ड यांनी शिट्ट्या फुंकून तेथून सगळयांना बाजूला करुन मोकळे स्टॅण्ड केले होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती.