Satara News :येरवळेत सापडला दुर्मीळ 'अल्बिनो तस्कर' साप!
सर्पमित्रांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले
कराड : जुने येरवळे (ता. कराड) येथे तस्कर जातीचा दुर्मीळ अल्बिनो साप आढळून आला आहे. चार फूट लांब, पांढरा व पिवळसर रंग असलेल्या या अत्यंत दुर्मीळ तस्कर अल्बिनो सापाची कराड तालुक्यात पहिल्यांदा तर जिल्हयात तिसरी नोंद केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्रांनी हा साप सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडला.
याबाबत वाईल्डहार्ट रेस्क्यूअर नाईटस् ट्रस्ट कराडचे गणेश काळे यांनी सांगितले की, जुने येरबळे येथे सचिन मोहिते यांना हा अनोखा साप दिसून आल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक सर्पमित्रांना याबाबतची माहिती दिली. सर्पमित्र विशाल खंडागळे, विनोद पानस्कर, सागर बिंद्रा, अनिकेत यादव यांनी या सापाला यशस्वीरित्या पकडले. सुरुवातीला सर्पमित्रांना सापाच्या रंगाबाबत काही शंका होत्या.
हा साप नक्की कोणत्या जातीचा आहे, याची खात्री नव्हती. दरम्यान बाईल्डहार्ट रेस्क्यूअर नाईटस् संस्थेचे तांबवे येथील प्राणीमित्र रोहित कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सापाची काळजीपूर्वक पाहणी करून दुर्मीळ अल्बिनो तस्कर जातीचा साप असल्याचे सांगितले.
याबाबतची माहिती मिळताच बाईल्डहार्ट रेस्क्यूअर नाईटस् संस्थेचे गणेश काळे व योगेश शिंगण यांनी घटनास्थळी दाखल होत सापाची माहिती घेतली. यावेळी हा दुर्मीळ साप कराड तालुक्यांत पहिल्यांदाच आढळला असल्याचे समोर आले.