Satara News : भिलारमध्ये बिबट्याचे थैमान ; वनविभागाकडे कारवाईची मागणी
भिलार परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थ भयभीत, शेतकऱ्यांची चिंता वाढली
भिलार : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बिबट्या आणि त्याचा बछडा भरवस्तीत वावरताना दिसल्याने नागरिक आणि शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.
भरवस्तीत बिबट्याचे दर्शन २ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात बिबट्या आणि त्याचा बछडा दिसला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास भरवस्तीतूनच बिबट्याने फेरफटका मारल्याचे दिसले ,
त्याच रात्री पुन्हा शाळेच्या पाठीमागे बिबट्याचा बछडा दिसल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनांमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्ट्रॉबेरी लागवडीदरम्यान शेतकऱ्यांची वाढती चिंता सध्या भिलार परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीचा हंगाम सुरू असून, शेतकरी रात्री-अपरात्री शेतात काम करत आहेत.
"अशा वेळी अचानक बिबट्या समोर आला, तर जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही," अशी शेतकऱ्यांची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष देऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.
“या भागात नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने त्वरित कारवाई करावी,” अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.