राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक कायद्याच्या कचाट्यात
गुरूवारी उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी
कराड प्रतिनिधी
कार्यकारी समितीची वयोमर्यादा, कार्यकाल मर्यादा तसेच मतदानाच्या हक्काबाबत राष्ट्रीय क्रीडा संहितेत असलेले नियम पायदळी तुडवत आपल्याला सोयिस्कर पडणाऱ्या नियमानुसार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या येत्या 21 जुलैला होत असलेल्या चौवार्षिक निवडणुकीला तात्काळ स्थगिती दिली जावी म्हणून सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे प्रा. अशोककुमार चव्हाण व राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेबाबत उच्च न्यायालयात गुरूवार 18 जुलैला तातडीची सुनावणी घेतली जाणार असल्यामुळे 21 जुलैला राज्य संघटनेची निवडणूक होणार की स्थगिती मिळणार याकडे तमाम कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
18 जूनला राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून या निवडणुकीत क्रीडा संहितेला पायदळी तुडवले जाणार असल्याचे संकेत मिळत होते. त्याविरोधात अनेक संघटनांनी राज्य संघटनेशी पत्रव्यवहार करून ते थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या पत्रांना संघटनेकडून केराची टोपली दाखवण्यात आली. तसेच काही संघटनांच्या पीटीआर उताऱ्यात गोंधळ असल्याचेही समोर आले होते. काहींचे पीटीआर नामंजूर होते तर काही संघटनांमध्ये वाद असल्यामुळे त्यांच्यात कायदेशीर लढाई सुरू असूनही आपल्या जवळच्या संघटनांच्या जिल्हा प्रतिनिधींना मान्यता देण्याचे बेकायदेशीर काम राज्य संघटनेकडून करण्यात आले. याबाबत राज्य संघटनेकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे अखेर संयम सुटलेल्या सातारा जिल्हा हौशी कबड्डी संघटनेने न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रीडा संहितेनुसार राज्य व सर्व जिल्हा संघटनांनी प्रथम घटनादुरुस्ती करावी आणि त्यानुसार निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आदेश क्रीडा संहितेच्या संदर्भाने या पूर्वीच न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघाच्या कार्यकारिणीला बरखास्त केले आहे. हे उदाहरण ताजे असतानाही राज्य संघटनेकडून क्रीडा संहितेला कागदावरच ठेवण्याचा प्रकार झाल्याची बाब समोर आणत सातारा जिल्हा हौशी कबड्डी असो. च्या वतीने अॅड. वैभव गायकवाड यांनी ही याचिका दाखल केली आहे.
सातारा जिह्याचा बदल अर्ज प्रलंबित
तथाकथित सातारा जिल्हा कबड्डी असो. (नोंदणी क्र.15040) अध्यक्ष बबनराव उथळे यांनी 12 डिसेंबर 2024 नंतर धर्मादाय आयुक्त सातारा यांच्याकडे दाखल केलेल्या बदल अर्जास प्रा. अशोककुमार चव्हाण व अन्य आठ जणांनी आक्षेप घेतला आहे. त्यांची सुनावणी सुरू असून बदल अर्ज प्रलंबित आहे. स्व.संग्राम उथळे यांच्या निधनानंतर सुरेश पाटील यांची सचिव म्हणून बेकायदेशीर नियुक्ती अध्यक्षांनी केली आहे. क्रीडासंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अध्यक्ष बबनराव उथळे व तथाकथित सचिव सुरेश पाटील यांनी राज्य कबड्डी असो.च्या मतदार यादीसाठी पाठवलेली सायराबानू शेख, रमेश देशमुख, शशिकांत यादव यांच्या नावांचा समावेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार यादीत केला आहे. या प्रक्रियेच्या विरोधात प्रा.अशोककुमार चव्हाण यांनी केलेल्या तक्रारींना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बेकायदेशीर उत्तरे दिल्यामुळेच उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.