सातारा-लोणंद महामार्गाचे होणार दुहेरीकरण
एकंबे :
सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिरवळ-लोणंद महामार्गाच्या चौपदरीकरण बरोबरच लोणंद ते सातारा महामार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 611 कोटी 84 लाख रुपये मंजूर केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण मार्फत शनिवारी दुपारी दोन वाजता माहिती देण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वपूर्ण अशा सातारा जिह्यातील राष्ट्रीय महामार्ग-965 डी. डी. विभाग एकवरील शिरवळ-लोणंद विभागाच्या पेव्हड शोल्डरसहित टू लेन आणि फोर लेनमध्ये अपग्रेडेशनसाठी आणि राष्ट्रीय महामार्ग-965 डी वरील लोणंद-सातारा विभागाच्या पेव्हड शोल्डरसहित टू लेनमध्ये अपग्रेडेशनसाठी 611.84 कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली आहे.
सदर प्रकल्प रस्ता राष्ट्रीय महामार्ग-965 डी आणि राष्ट्रीय महामार्ग-965 डी. डी. हा पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग एनएच-48, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग एनएच-65, पालखी महामार्ग एनएच-965 आणि निर्माणाधीन सुरत-चेन्नई द्रुतगती मार्गासह प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा फीडर आहे.
सातारा, फलटण, लोणंद आणि शिरवळच्या आजूबाजूच्या परिसरात झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिक वाढ यामुळे या मार्गावरील वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. हा प्रकल्प सातारा-लोणंद एनएच-965 डी आणि शिरवळ-लोणंद एनएच-965 डी. डी या विभागातील जड वाहनांच्या वाहतुकीमुळे आणि प्रदेशातील वाढत्या रिबन आणि औद्योगिक विकासामुळे मार्ग अद्ययावत करण्याची मागणी पूर्ण करणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.