Satara News: साताऱ्यात महिलेने दिला चार बाळांना जन्म, चारही बालके सुदृढ
नवजात चार बालकांमध्ये तीन मुली व मुलगा असून सर्व बालके सुदृढ आहेत
By : किरण मोहिते
सातारा : साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात असा प्रसंग घडला की डॉक्टर, नर्सेस आणि नातेवाईक सर्वांनीच ‘हे खरंय का?’ असा प्रश्न केला. एका मातेच्या पोटी एकाचवेळी चार बाळांचा जन्म झाला असून, याआधी पाच वर्षांपूर्वी तिला तिळं झालं होतं. या मातेच्या पदरी आता सात बालके आहेत. दरम्यान, नवजात चार बालकांमध्ये तीन मुली व मुलगा असून सर्व बालके सुदृढ आहेत.
बाळंत महिलाही सुखरुप आहे. याबाबत अधिक माहिती अशी, बाळंत महिला काजल विकास खाकुर्डिया (वय 27, रा. सासवड, जि. पुणे) येथील रहिवासी. काजलचे पती हे मूळचे गुजरातचे असून सासवड येथे गवंडी म्हणून काम करतात. काही महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी काजल आपल्या आईकडे कोरेगावात आली होती. शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजता पोटदुखीची तक्रार झाल्यानंतर तिला साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अवघड अशी डिलिव्हरी शर्थीने पार पाडत काजलला 3 मुली व 1 मुलगा सुखरूप प्रसूत केला. ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली. आई व चारही बाळं ठणठणीत असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. त्यांची नावं ओंकार, खुशी आणि नेहा आहेत.
आता पुन्हा चार बाळांचा जन्म झाल्याने एकूण सात लहानग्यांचा किलबिलाट घरात होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सदाशिव देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण स्टाफ यांनी मेहनत घेतली. त्यांच्या कौशल्यामुळे ही अवघड डिलिव्हरी यशस्वी झाली. साताऱ्यातील या घटनेमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर देईल असा चमत्कार झाल्याचे लोक सांगत आहेत.
अतिशय दुर्मीळ घटना
अतिशय दुर्मीळ अशी घटना असून ७० लाख ते ५ कोटी डिलिव्हरी होत असतात, यामध्ये एखादी केस अशी पाहायला मिळते, असे सातारा जिल्हा रुग्णालयाचे स्त्री रोगतज्ज्ञ सदाशिव देसाई यांनी सांगितले.