Satara Rain Update: साताऱ्यातील गोगवे-एरणे पूल गेला वाहून, रस्ता बंद
नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
By : इम्तियाज मुजावर
महाबळेश्वर: सातारा जिल्ह्यातील गोगवे–एरणे परिसरात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नव्याने बांधलेला पूल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल आणि त्याला जोडणारा रस्ताही पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. या दुर्घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संतप्त नागरिकांनी प्रशासन आणि ठेकेदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
"आमचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे," अशी संतापजनक प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील हा भाग दुर्गम डोंगराळ असून, पावसामुळे दळणवळण पूर्ण ठप्प झालं आहे. महाबळेश्वर आगाराकडून पुढील १५ दिवस एसटी सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या भागातील शाळकरी मुले, रुग्ण, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. सौंदरी-खरोशी रस्ता पाण्याखाली सात ते आठ गावांचा संपर्क तुटला!
तापोळा-कोयना परिसरात मुसळधार, जनजीवन विस्कळीत
तापोळा-कोयना विभागात सध्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसामुळे सौंदरी-खरोशी रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील सात ते आठ गावांचा संपर्क तुटलेला आहे. वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून, गावातील नागरिक अडकून पडले आहेत.
मदतीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुर्गम भागात पावसाचा जोर कमी न झाल्यास बचाव कार्यालाही अडचणी येत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.