साताऱ्याचा युवक युक्रेन युद्धातून मुक्त! ‘तरुण भारत’च्या आंतरराष्ट्रीय लढ्याला यश
दीपक प्रभावळकर सातारा
रशियन सरकारला हाताशी धरून एजंटांनी रशियात नेहलेला साताऱ्याचा युवक थेट युक्रेन युद्धात उतरला होता. तीन महिने संपर्कहिन राहिलेल्या या युवकाचा अखंड हिंदूस्थानातून केवळ ‘सातारा तरुण भारत’ पाठपुरावा करत होता. परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, मॉस्को दूतावासातील कित्येक अधिकारी, रशियन आर्मी आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पाठपुराव्याचे युद्ध जिंकले गेले. ‘तरुण भारत’चा हा आंतरराष्ट्रीय पाठपुरावा 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. सातारचा युवक युक्रेनच्या रक्तरंजित क्रांतीतून बाहेर पडला आहे. रविवारी पहाटे युक्रेन बॉर्डर क्रॉस करून तो रशियात आला. आता अजरमैजानच्या उलट दिशेने प्रवास करत तो मंगळवार, बुधवारपर्यंत मॉस्कोत येईल. त्यानंतर त्याचा ‘मायभूमी’चा प्रवास सुरू होईल. दरम्यान, हा प्रकार राज्य शासन, केंद्र शासन किंवा परराष्ट्र मंत्रालय यांच्या आधीच ‘तरुण भारत’च्या हाती लागल्याचे हे आणखी एक यश आहे.
भारतीय सैन्यात रुजु होण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा सातारी युवक एजंटांच्या बळी पडला. रशियन सैन्यात मॉस्को पुरतेत काम देतो म्हणून त्याला रशियन ‘टुरिस्ट व्हिसा’ वर पाठवण्यात आले. मॉस्को विमानतळावर दाखल झाल्यावर त्याला कोणतीही कल्पना न देता विविध वाहनातून प्रवास करत युक्रेन युद्ध तळावर नेण्यात आले. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय क्षेपणास्त्र आणि अजस्त्र रणगाड्यांच्या नरसंहार युद्धात घालून त्याच्यावर प्रत्येक क्षणी मरणाचे क्षेपणास्त्र डागण्यात आले.
‘तरुण भारत’ने शोधून काढला ठावठिकाणा
रशियात दाखल झाल्यापासून कित्येक महिने संपर्कहीन झालेल्या सातारच्या युवकाचा संपर्क झाल्यावर तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एका प्रश्नाचे उत्तर मिळायला पाच ते सहा दिवस अशा क्रमाने ‘तरुण भारत’ व कुटुंबिय यांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि लोकेशन शोधून काढले. हे लोकेशन मॉस्कोचे नसून युक्रेनमध्ये असल्याचे लक्षात येताच ‘तरुण भारत’च्या ब्रेकिंग न्यूज आणि पाठपुराव्याला सुरुवात झाली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तपासयंत्रणांना कोणतीही बाधा न आणता ‘तरुण भारत’ने हा पाठपुरावा परराष्ट्र मंत्रालय आणि मॉस्को दूतावासाशी केला.
मृतांच्या खाचात पडलेल्या सातारी युवकाचे मनोबल
युक्रेनमधील प्रचंड संग्राम सुरू असलेल्या खारकीव्ह आणि मारियापोल या दोन शहरांच्या मध्येच युवक युद्धभूमीत होता. क्षेपणास्त्रांनी मृतांचे खच पडत असताना अचानक आयुष्यावर युद्ध लादलेला हा युवक आपल्या मनोबलासह खंबीर होता. आम्ही त्याच्या मनोबलासाठी इकडून काम करत होतो.
काय आहे तरुणाची सद्य स्थिती
युद्धभूमीतून बाहेर पडला तरी काळजी कायम
युक्रेनचे मोठे शहर मारीओपोल ते नोवाचे काश्यक या महामार्गातून युवक युक्रेनबाहेर पडला आहे. त्याचा प्रवास उत्तरेकडे असलेल्या पाच हजार किलोमीटर वरील मॉस्कोकडे होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या काही तासांपासून तो जॉर्जिया, आर्मेनिया, अजरबैजान या देशांच्या दिशेने दिसत आहे.
सैनिकी मुख्य तळाला भेट देण्यासाठी ?
युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाने ब्लॅक टीच्या काठावर सैन्य तळ बनवले आहे. कदाचित या सैन्य तळावर रिर्पोटिंगचा आदेश झाला असावा. रात्री उशिरा सातारचा युवक पोचुबे शहरानजिक पोहोचला आहे.
रशियन सैन्याच्या ट्रकमध्ये आहेत नऊ जण
सातारी युवक प्रवास करत असलेल्या ट्रकमध्ये एकुण नऊ जण असून 6 रशियन व तीन अन्य देशी आहेत. शेकडो किलोमीटरचे रेगिस्तान किंवा शेकडो किलोमीटरचा बर्फाळ प्रदेश हे सोडून आता त्यांच्या प्रवासात शहर येत आहेत. रविवारी सकाळी आणि रात्री त्यांना चांगल्या हॉटेलात जेवण करता आले.