शाब्बास पोरींनो! आशियाई कुस्ती स्पर्धेत चंदेरी कामगिरी, रौप्यपदकाची कमाई
महिला मल्ल तन्वी मगदूम आणि प्रगती गायकवाड यांनी चमकदार कामगिरी
औंध : व्हिएतनाम येथे झालेल्या 17 आणि 23 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मराठमोळ्या महिला मल्ल तन्वी मगदूम आणि प्रगती गायकवाड यांनी चमकदार कामगिरी करीत दोन रौप्यपदकाची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्ती संघात महाराष्ट्रातील तन्वी मगदूम 59 किलो आणि प्रगती गायकवाड 62 किलो वजनगटात दोघींनी स्थान मिळवले होते.
तन्वीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, मात्र तीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तन्वी मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती आखाड्यात प्रशिक्षक दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ती ड्रीम फाऊंडेशन संस्थेची मानधनधारक कुस्तीगीर आहे.
62 किलो वजनगटात प्रगतीने देखील धमाल उडवून दिली मात्र अंतिम फेरीतील पराभवाने तीला रौप्यपदक मिळाले. प्रगती मूळची पांगरी या माण येथील कुस्तीगीर असून ती कांदीवली मुंबई येथील साई कुस्ती केंद्रात प्रशिक्षक अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
समर्थ म्हाकवे सहभागी
23 वर्षाखालील आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत कांदिवली येथील साई कुस्ती केंद्राचा समर्थ म्हाकवेने 60 किलो वजनगटातून ग्रीकोरोमन प्रकारात भारतीय कुस्ती संघात स्थान मिळवले होते. फ्री स्टाईल आणि ग्रीकोरोमन प्रकारात स्थान मिळवणारा महाराष्ट्रातील तो एकमेव मल्ल सहभागी झाला होता.