सरपंचपदाच्या आरक्षणावरुन कही खुशी.. कही गम.., पदाचा मान महिलांच्या पथ्यावर
तासगांव तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीचे २०२५ ते २०३० साठीचे सरपंचपदाचे आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले
By : सुनिल गायकवाड
तासगाव : तासगांव तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीचे २०२५ ते २०३० साठीचे सरपंचपदाचे आरक्षणावर बुधवारी शिक्कामोर्तब झाला आहे. असे असले तरी या आरक्षणाने काहीजण नाराज तर काहीजण आनंदी झाले आहेत. त्यामुळे या आरक्षणाने तालुक्यात कही खुशी.. कही गम.. असेच चित्र पाहवयास मिळत आहे. तालुक्यातील बहुतांश प्रमुख गावात महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
६८ ग्रामपंचायतीचे २०२५ ते २०३० साठीचे सरपंच पदाचे आरक्षण काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. ही प्रतिक्षा बुधवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील बहुउद्देशीय हॉल येथे निरीक्षक राजीव शिंदे यांच्या उपस्थितीत व तहसिलदार अतुल पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरक्षण सोडत प्रक्रियेनंतर संपली.
१९९५ चे आरक्षण डोळयासमोर ठेऊन ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीसाठी अनुसुचित जाती - ७ पैकी ४ महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग - १८ पैकी ९ महिला, तसेच सर्वसाधारण - ४३ पैकी २२ महिला असे आरक्षण निश्चित करण्यात आले. प्रारंभी अनुसुचित जातीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामध्ये मोराळे पेड, खुजगांव, कवठेएकंद, कचरेवाडी येथे स्त्रि आरक्षण निश्चित करण्यात आले. तर गोटेवाडी, नागेवाडी, सिध्देवाडी येथे पुरूष आरक्षण निश्चित केले.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यामध्ये लिंब, हातनोली, बंजारवाडी, सावळज, दहिवडी, पेड, यमगरवाडी, मतकुणकी, तुरची या गावात स्त्रि आरक्षण निश्चित करण्यात आले. तर कुमठे, कौलगे, निमणी, बेंद्री, किंदरवाडी, आरवडे, डोंगरसोनी, पुणदी, बोरगांव येथे पुरूष आरक्षण निश्चित करण्यात आले.
सर्वसाधारण यामध्ये आळते, हातनूर, अंजनी, गौरगांव, वडगांव, जरंडी, बस्तवडे, वायफळे, विसापूर, शिरगांव वि, बलगवडे, डोर्ली, चिंचणी, वासुंबे, लोढे, गव्हाण, निंबळक, पानमळेवाडी, ढवळी, बाघापूर, नरसेवाडी, धोंडेवाडी, येथे स्त्रि आरक्षण निश्चित करण्यात आले. तर बिरणवाडी, शिरगांव कवठे, नेहरूनगर, नागांव नि, सावर्डे, धुळगांव, चिखलगोठण, वज्रचौडे, पाडळी, येळावी, मांजर्डे, राजापूर, जुळेवाडी, मणेराजुरी, धामणी, नागांव कबठे, योगेवाडी, विजयनगर, लोकरेवाडी, भैरववाडी, उपळावी, येथे पुरूष आरक्षण निश्चित करण्यात आले.
अधिकच्या ग्रामपंचायतीत महिला सरपंच होणार..
तालुक्यातील कवठेएकंद, सावळज, हातनोली, तुरची, दहिवडी, पेड, हातनूर, अंजनी, बस्तवडे, बायफळे, विसापूर, बलगवडे, चिंचणी, गव्हाण, ढवळी, या प्रमुख गांवासह इतर २० अशा एकूण ३५ ग्रामपंचायतीत महिला सरपंच होणार आहेत. त्यामुळे पुरूष आरक्षण पडेल असे डोळे लावून बसलेल्या अनेकांना भ्रमनिरास झाला आहे.
कही खुशी.. कही गम...
तालुक्यातील काही मोठया गावात महिलांना सरपंच पदाची संधी मिळणार असल्याने तेथील इच्छुकांची नाराजी झाली आहे. तर तालुक्यातील कुमठे, बोरगांव, सिध्देबाडी, पुणदी, आरवडे, डोंगरसोनी, सावर्डे, येळावी, मांजर्डे, मणेराजुरी, राजापूर, या प्रमुख गांवासह इतर २२ अशा एकूण ३३ ग्रामपंचायतीत पुरूषांना सरपंच पदाची संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेकजण आनंदी पाहवयास मिळत असून तालुक्यात या आरक्षणामुळे कही खुशी कही गम.. असेच चित्र पाहवयास मिळत आहे.