मोहरीच्या दाण्यावर सरस्वती
काही लोकांना कलेची अद्भूत देणगी असते, याचा परिचय आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. या कलेला धर्म आणि देवाविषयी असलेल्या श्रद्धेची जोड मिळाली, की, अद्भूत कलाकृती निर्माण होतात. त्या पाहिल्या म्हणजे आपण आश्चर्य व्यक्त करण्याखेरीज दुसरे काही करु शकत नाही. आपल्या कल्पनेतही येणार नाहीत, अशा कलाकृती प्रत्यक्ष तयार करणाऱ्या या कलाकारांचे आपल्याला कौतुक वाटते.
पश्चिम बंगाल राज्यातील नवद्वीप येथील एक कलाकार गौतम सहा यांनी मोहरीच्या दाण्यापासून 5.5 मिलीमीटर उंचीची सरस्वती देवीची मूर्ती निर्माण केली आहे. सहा यांचे वय 57 वर्षे आहे. ते व्यवसायाने चित्रकलेचे शिक्षक आहेत. त्यांचे सर्व कुटुंबच या ना त्या कलेशी जोडले गेले आहे. अशा मूर्ती बनविण्याचा त्यांचा छंद बऱ्याच काळापासूनचा आहे. मात्र मोहरीच्या दाण्यापासून सरस्वतीची मूर्ती बनविण्याची ही त्यांची कृती आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणारी ठरली आहे.
कोरोना उद्रेकाच्या काळात लागलेल्या लॉकडाऊन मध्ये त्यांनी सूक्ष्म मूर्ती बनविण्यास प्रारंभ केला. प्रारंभीच्या काळात त्यांनी मूग डाळीचा दाणा, किंवा तांदळाचा दाणा तर कधी खडू अशा वस्तूंवर मूर्ती बनविल्या. त्यानंतर त्यांच्या मनात अतिसूक्ष्म मूर्ती बनविण्याची कल्पना झळकली. त्यामुळे त्यांनी अतिशय लहान असणाऱ्या मोहरीच्या दाण्यापासून मूर्ती बनविण्याचा निर्धार केला. हे काम अतिशय नाजूक असते. थोडी गडबड झाली तरी तोवेळपर्यंत निर्माण झालेली सर्व कलाकृती वाया जाण्याचा धोका असतो. तरीही त्यांनी अतिशय एकाग्रचित्ताने मोहरीच्या दाण्यावर ही मूर्ती साकारली आहे. ती अतिशय लोकप्रिय झाली आहे.