भाऊसिंगजी रोडवरील सराफ दुकान चोरीचा छडा! कामगारानेच रचला चोरीचा कट, बनावट चाविच्या आधारे चोरी
तीघांना अटक, 15 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील मध्यवस्तीतील गजबजलेल्या भाऊसिंगजी रोडवरील सराफ दुकानात गुरूवार (25 जानेवारी) रोज भरदुपारी दोघा चोरट्यांनी धाडसी चोरी करुन 25 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आले असून तीघांना अटक करण्यात आली आहे. या सराफ दुकानात काही महिन्यांपूर्वी काम करणाऱ्या एका कामगारानेच हा चोरीचा कट रचला असून साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने भोर (जि. पुणे) येथून पिंटू जयसिंग राठोड (वय 25), पुनमसिंग आसुसिंग देवरा (वय 21 दोघेही रा. नून, पो. फुंगणी, ता. जि. सिरोही) यांना अटक केली. तर या चोरीचा मास्टरमाईंड केतनकुमार गणेशराम परमार (वय 23 रा. नून, पो. फुंगणी, ता. जि. सिरोही) याला उत्तरेश्वर पेठ येथून अटक करण्यात आली आहे. या तीघांकडून पोलिसांनी 15 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 224 ग्रॅम सोने, 62 हजार रोकड जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार (25) जानेवारी रोजी भाउसिंगजी रोडवरील सिमंधर ज्वेलर्स या दुकानात दोघा चोरट्यांनी धाडसी चोरी करुन 225 ग्रॅम सोने व 7 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. याबाबतची फिर्याद जयेश धनराज जैन (वय 50 रा. ताराबाई रोड) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती. चोरी करतानाचे सिसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक व जुना राजवाडा पोलीस या घटनेचा तपास करत होते. तपास करत असताना गुजरी परीसरात काम करणाऱ्या कारागीरांनीच हा गुन्हा केल्याची माहिती तपासात समोर आली. याचसोबत यामध्ये सिरोली राजस्थान येथील कारागीरांचा समावेश असल्याचीही माहिती निष्पण्ण झाली. यानुसार एक पथक सिरोली येथे जाण्यासाठी तयार केले, असता या चोरीतील दोघे जण वरवे बुद्रुक (ता. भोर जि. पुणे) येथील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून पिंटू व पुनमसिंग या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व सोने जप्त केले. दरम्यान ही चोरी केतनकुमार याच्या सांगण्यावरुन केल्याची कबुली या दोघांनी दिली. यानुसार केतनकुमार यालाही उत्तरेश्वर पेठ येथून अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, अमित सर्जे, समीर कांबळे, विनोद कांबळे, अनिल जाधव, सुशिल पाटील, अमर आडुळकर, विनोद चौगुले यांनी ही कारवाई केली.
तपासासाठी 6 पथके
या चोरीचा तपास करण्यासाठी 6 पथकांची नेमणूक करण्यात आली होती. घटनास्थळावरील साक्षीदार व कारागीर यांच्याकडे चौकशी करणे, सिसीटीव्हीची तपसाणी करणे, मोबाईल तांत्रीक विश्लेषणासाठी एक पथक, परराज्यातून गुजरी परीसहरासह कोल्हापूर शहरात सराफ कामासाठी आलेल्या कारागीरांची माहिती घेण्यासाठी एक पथक, शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी व माहिती घेण्यासाठी एक पथक अशा सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.
कामगारानेच रचला कट
केतनकुमार परमार हा सिमंधर ज्वेलर्समध्ये गेल्या वर्षभरापासून कामास होता. त्याला दुकानातील खडा आणि खडा माहिती आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याने येथील काम सोडून उत्तरेश्वर पेठेत एका सराफाकडे काम सुरु केले होते. या चोरीचा कट केतनकुमानेच पिंटू व पुनमसिंग यांना हाताशी धरुन रचला. केतनने या चोरीत बनावट चावीचा वापर केला. प्रत्यक्ष चोरी पिंटू व पुनमसिंग यांनी केली. चोरी केल्यानंतर रिक्षातून तावडे हॉटेल व तेथून भोर येथे गेल्याचीही कबूली या दोघांनी दिली. पिंटू व पुनमसिंग हे पुणे येथील एका कापड दुकानात कामास होते. एक महिन्यापूर्वी केतनने या दोघांना कोल्हापूरात बोलावून घेतले. यानंतर हा कट शिजला. एक महिन्यापासून हे तीघे दुकानाची रेकी करत होते. महिन्याभरात त्यांनी दुकानाच्या बनावट चाव्या तयार केल्याचेही तपासात समोर आले आहे.
10 हजार रुपयांचे बक्षीस
भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे गुजरीतील सराफ व्यावसायीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. यामुळे जुना राजवाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या घटनेचा तपास करत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडून 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहिर करण्यात आले.