सराफ गल्ली : परंपरा, प्रेम अन् शेजारधर्माचा संगम!
सामाजिक सौहार्दाचं जिवंत उदाहरण-सराफ गल्ली
बेळगाव : ‘शेजारधर्म’ या शब्दात ‘शेजार’ आणि ‘धर्म’ हे दोन शब्द आहेत. संस्कृतमध्ये ‘धारयति इति धर्म:’ म्हणजे धारण करण्यासारखं जे आहे, ते धर्म. संकटाच्या किंवा अडचणीच्या काळात शेजाऱ्यांनी एकमेकांना मदत करणे, हीच शेजारधर्माची खरी ओळख. आजच्या यांत्रिक युगात, दरवाजाबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या सुरक्षिततेसाठी असले तरी, यंत्रांपेक्षा माणसांवर ठेवलेला विश्वास अधिक मोलाचा ठरतो. पूर्वीच्या काळी शेजाऱ्यांशी असलेला आपुलकीचा, आप्तस्वकीय संबंध आज दुर्मीळ होत चालला आहे. लहानपणी स्वत:च्या घरापेक्षा शेजाऱ्यांच्या घरी अधिक वेळ घालवला जात असे. त्यांच्या घरी हक्काने जेवण, वाटीभर साखर किंवा कप-बशा घेणे-देणे अगदी सहज आणि स्नेहभावाने व्हायचं. गल्लीतील नागरिक सुख-दु:खात, सण-उत्सवात एकत्र येत कार्य करतात. ही एक वेगळीच सौहार्दाची भावना असते.
बेळगावातील शहापूर या उपनगरातील ‘सराफ गल्ली’ ही अशीच एक खास गल्ली आहे. जी आजही शेजारधर्म जपते आहे. या गल्लीत पूर्वी ‘सराफ’ आडनावाची अनेक कुटुंबं राहत असल्याने या ठिकाणाला ‘सराफ गल्ली’ हे नाव रुढ झालं. प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मही याच गल्लीतला. ते इथेच लहानाचे मोठे झाले. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी चित्रपटसृष्टीकडे वाटचाल केली. या गल्लीत शिवजयंती, गणेशोत्सव, होळी अशा सणांवेळी सारे नागरिक एकत्र येतात आणि सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. ‘गल्लीतील सामाजिक एकोप्याचे चित्र आजही तसच टिकून आहे.’ असे येथील नागरिक सांगतात.
जसजसे दिवस सरकत गेले, तसतशी पारंपरिक वाडा आणि चाळ संस्कृती लोप पावू लागली आणि त्याजागी फ्लॅट संस्कृतीचा उदय झाला. घरांचे उघडे दरवाजे कायमचे बंद झाले. सोसायट्या आणि आपर्टमेंट्समध्ये शेजाऱ्यांमध्ये अंतर निर्माण झालं. पण, बेळगावातील काही गल्ल्या अजूनही आहेत जिथे शेजारधर्म टिकून आहे. त्यापैकीच एक म्हणजे सराफ गल्ली.
या गल्लीतली घरं राजवाड्यासारखी भक्कम, टुमदार आणि प्रशस्त आहेत. लांब-रुंद आणि कौलारु छतांची ही जुनी घरे म्हणजे इतिहास जपणारी वास्तूच जणू.
या गल्लीत खळनाथ आणि भेकाळनाथ असे दोन मठ असून, गल्लीतील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच सक्कण्णवर यांच्या मालकीचं एक खासगी श्री दत्त मंदिरही आहे. या मंदिरात आजही पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली जाते. या गल्लीत दर शनिवारी बाजार भरतो. खेड्यापाड्यातून आलेले शेतकरी इथे ताजी भाजी, कडधान्यं, प्लास्टिक वस्तू, कपडे, भांडी आणि रोजच्या गरजेच्या अनेक वस्तू अगदी स्वस्त दरात विकतात. त्यामुळे या बाजाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. सराफ गल्ली ही बेळगावातील एक अशी जागा आहे, जिथे सामाजिक सलोखा, शेजारधर्म आणि परंपरेचा वारसा आजही जपला जातो. बदलत्या काळातही आपुलकी, एकत्रितपणा आणि सामाजिक बांधिलकीचं हे उदाहरण इतर गल्ल्यांसाठी प्रेरणादायी ठरावं, अशीच अपेक्षा.
‘माझं वेणुग्राम’ या विशेष मालिकेमधून आपल्याला बेळगावातील विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गल्ल्यांची माहिती मिळत राहील. या मालिकेच्या पुढील भागांमध्ये अशा अनेक गल्ल्यांची ओळख करून देण्यात येणार आहे, ज्या केवळ वास्तूशिल्प किंवा भूतकाळापुरत्या मर्यादित नाहीत, तर आजही सामाजिक सलोखा, परंपरा आणि संस्कृतीचे जतन करत आहेत. वाचकांनी आणि प्रेक्षकांनी पुढील भागासाठी लक्ष ठेवावे ‘तरुण भारत’च्या यू ट्यूब चॅनलवर दैनिक आवृत्तीमध्ये ‘माझं वेणुग्राम’ ही मालिका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी प्रसिद्ध होणार आहे. वाचकांनी यांची नोंद घ्यावी आणि बेळगावच्या वैभवशाली वारशाचा एक अविभाज्य भाग व्हावे, ही विनंती..