कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकधर्मातील सप्तभगिनी

06:30 AM May 06, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय लोकमानसात पूर्वापार धर्माचे बरेच मोठे प्रस्थ असून इथल्या दैवत परिवारातून सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचे विलोभनीय दर्शन घडते. या भूमीच्या इतिहासाचे दर्शन घेण्यासाठी लोकधर्मात रुढ झालेल्या ग्रामदैवतांच्या एकंदर संकल्पना आणि रितीरिवाजांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. भारतभरातल्या आदिवासी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या असंख्य जनजातींमध्ये जी सात बहिणींच्या पूजनाची परंपरा आहे, ती खूप वैविध्यपूर्ण अशीच आहे. कोकणात एकेकाळी पश्चिम किनारपट्टीवरच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार असणाऱया चौलच्या बंदराचा देश विदेशांतून येणाऱया व्यापारी यात्रेकरू यांचा संबंध होता. या गावात जी सात ग्रामदैवतांची मंदिरे आहेत, ती सात बहिणींशी संबंधित असून, त्यांचा चंपावती, शीतला, एकवीरा, पद्मावती, कळलागी, हिंगुळजा आणि चतुर्सिती असा परिचय आहे. पूर्वाश्रमी चौल बंदर हे चंपावती म्हणून ओळखले जात होते आणि त्याला इथल्या सोनचाफ्याच्या वृक्षामुळे चंपावती हे नाव प्राप्त झाले, असे मानले जाते. पूर्वी इथल्या सोनचाफ्याची पूजा भाविकांद्वारे केली जायची. कोकणाप्रमाणे दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व तामिळनाडूत सात बहिणींची दैवत संकल्पना प्रचलित आहे.

Advertisement

जुन्या काळी जेव्हा एखाद्या रोगाची साथ यायची, तेव्हा आजच्यासारखे वैद्यकीय उपचार उपलब्ध नसल्याकारणाने समाजाला लोकधर्माचा आधार होता आणि त्यातून त्यांनी रोगांच्या साथीतून आपली आणि कुटुंबाची रक्षा व्हावी म्हणून लोकदेवतांची स्थापना केली. या देवता तामसी, रक्तलोलुप व रोगांच्या अधिष्ठात्या म्हणून नावारुपास आलेल्या असून त्यातली मरी किंवा शीतला ही देवीच्या आणि महामारीच्या रोगांची देवता म्हणून परिचित आहे. तिला सात बहिणींच्या गणात पेड्डम्म, इसोदम्म, मरीअम्म, अंकलम्म, एल्लम्म, नकुलम्म आणि अरिकम्म अशा देवतांना सात बहिणी म्हणून मानलेल्या असून त्यांना भजणारा मोठा भक्त परिवार आहे. आंध्र प्रदेशात पोलेरम्म, अंकम्म, मुथिलम्म, दिल्ली पोलासी, बंगारम्म, माथम्म व रेणुका या नावांनी सात बहिणींना देवता स्वरुप मानलेले आहे. पोलेरम्म ही देवीच्या रोगाची देवता असून, तिची अवकृपा होऊ नये म्हणून तिचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे. कर्नाटकातल्या म्हैसुरात सात बहिणींचा देवता परिवार मरीभगिनी म्हणून ओळखला जात असून, त्यांची पूजा रोग निवारण व्हावे, यासाठी केली जाते. तापाची देवता म्हणून बिसलमरी, दम्याच्या विकारापासून मुक्ती लाभावी यासाठी गुर्रलमरी, मातीच्या भांडांच्या देवता म्हणून केलमरीचे पूजन केले जाते. या तीन देवतांच्या परिवाराबरोबर हिरी, खरुगेरेमरी, चामुंडीश्वरी आणि उत्तनहळी अशा चार देवतांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सात बहिणींचा पोट्टूराझू हा पुरुष देव, त्यांचा भाऊ किंवा पती म्हणून मानला जातो. तामिळनाडूतल्या कोइंबतूरमध्ये सात बहिणी आणि त्यांच्या एकुलत्या एका भावाची मंदिरे असून तिथल्या लोकधर्मात या देवतांसमोर नतमस्तक होणारा मोठा भक्तसमुदाय आहे. सेनाकटची अम्मन, कोली अम्मन, उलकिरनी अम्मन, अकारी अम्मन, वंछी अम्मन, सेली अम्मन आणि कुंथन अम्मन अशी या सात बहिणींची नावे असून ऐनार हा त्यांचा भाऊ मानलेला आहे. शक्तीरुपिणी देवी पार्वतीशी या सात बहिणी संबंधित असून, तिच्यापासून त्यांची निर्मिती झाली, असे मानले जाते.

Advertisement

गुजरातमध्ये सात बहिणींची दैवत संकल्पना रुढ असून त्यात अवाल, जोगाल, तोगाल, होलबाय, बीजबाय, सोसाय आणि खोडियार अशा नावांनी त्या वंदनीय ठरलेल्या आहेत. सात बहिणींचा दैवत परिवार देशातल्या प्रदेशानुसार बदलत असून बऱयाच ठिकाणी त्यांना शीघ्रकोपी असल्याचे मानलेले आहे आणि त्यासाठी त्यांची अवकृपा होऊन आपणास नुकसान सोसावे लागू नये म्हणून भाविक त्यांच्या पूजनासंदर्भात सतर्क राहायचे. सात बहिणींच्या दैवतांपैकी फूलमाता ही रोगांची देवता म्हणून पूजली जाते. उर्वरित सितला, बडी, पनसाही, गुसूलिया, कंकर आणि मालबाई यांचाही संबंध विविध रोगांशी असून, रोगनिवारण होण्यासाठी त्यांची पूजा भाविक करीत होते. ‘कृतिका पुंज’ हा तारका समूह असून आकाशात दर्शन होणाऱया कृतिकांनी शिव-शक्तीपुत्र कार्तिकेयाचे पालन केल्याचे मानले जाते. या कृतिका सात बहिणी म्हणून परिचित असून त्यांचा विवाह सात भावांशी झाल्याचे मानले जाते. एकदिवस सात ऋषींनी या सात बहिणींपैकी अरुंधती वगळता, अग्नीशी संबंध प्रस्थापित केल्याचा संशय घेऊन सहा बहिणींची घरातून हकालपट्टी केल्याची लोककथा रुढ आहे. गोव्यातल्या लोकधर्मात सात बहिणी आणि त्यांच्या एकुलत्या एका भावाची कथा पूर्वापार प्रचलित आहे. या सात बहिणींची नावे निश्चित कोणती होती, याबाबत आजतागायत ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे या सात बहिणींच्या देवता परिवाराच्या नावांत भिन्नता पाहायला मिळते. परंतु भावाचे नाव मात्र खेतलो किंवा खेतोबा, असे प्रामुख्याने मानले जाते. काही जणांच्या मते या सात बहिणी आपल्या भावासमवेत घाटावरून डिचोली महालातल्या मये गावातल्या वण्डय़ार येथे ऐरावताच्या पाठीवर बसून आल्या. त्यात केळबाय, सातेरी, शितलादेवी मयेत स्थायिक झाल्या तर लईराय शिरगावी, मोरजाय मोरजी, जुयजाय जुवे आणि मिराबाय म्हापशात गेल्या. त्यांचा भाऊ खेतोबा मये जवळच्या वायंगिणीत स्थायिक झाला, असे मानले जाते.

सात बहिणीत केळबाय ही ज्येष्ठ असल्याने, तिने वण्डय़ार येथे आल्यावरती खेतोबाला अग्नी आणण्यासाठी मये गावात पाठवला परंतु तो बराच वेळ आला नसल्याने, तिने लयरायला खेतोबाची चौकशी करण्यास पाठविले असता, तो गावात समवयस्क मुलांबरोबर खेळत असलेला दृष्टीस पडला. त्याच्या या कृत्याने म्हणे लयरायला राग आला आणि तिने खेतोबाच्या कंबरेत लाथ हाणली. त्यामुळे खेतोबा कंबरेत वाकलेल्या स्थितीत वायंगणीत मूर्ती स्वरुपात स्थायिक झाला. या साऱया प्रकाराला आपण जबाबदार असल्याचे मानून केळबाय मुळगावला गेली. डिचोलीतल्या मुळगावची ग्रामदेवता असणारी ही देवी चैत्रात पेठेत बसून पारंपरिक मार्गाने मयेत येते. मयेहून केळबाय मुळगावला निघते त्या रात्री माल्याची जत्रा संपन्न होते. या जत्रेत मध्यरात्रीला प्रज्वलित मातीचा महाकाय दिवा मस्तकी धारण व्रतस्थ भाविक आगळय़ा-वेगळय़ा सांस्कृतिक संचिताचे दर्शन घडवितो.

वैशाख महिन्याच्या शुक्ल पंचमीच्या रात्री देवस्थानचा पुजारी लयराय देवीचे प्रतिक असणारा धातुचा कलश मस्तकी धारण करून धगधगत्या निखाऱयांवरून चालत गेल्यानंतर व्रतस्थ भाविक हजारोंच्या संख्येने प्रवेश करतात. अग्नीदिव्य करणाऱया लयराय देवीची जत्रा केवळ गोव्यातच नव्हे तर दक्षिण कोकणातल्या व्रतस्थ भाविकांना निखाऱयांवरून चालण्यास प्रवृत्त करते. सात बहिणी आणि त्यांच्या एकुलत्या एका भावाच्या पूजनाची परंपरा गोव्यातल्या लोकधर्मातल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्यांचे विलोभनीय असे दर्शन घडवत आहे. सात बहिणींची पूजन परंपरा भारतीय लोकधर्माशी असलेल्या ऋणानुबंधाची प्रचिती आणून देते.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article