राजकुमारसोबत झळकणार सान्या
राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांचा नवा चित्रपट ‘टोस्टर’चा टीझर जारी करण्यात आला आहे. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाचे प्रदर्शन नेटफ्लिक्सवर होणार आहे. याच्या टीझरमध्ये राजकुमार अन् सान्या पतीपत्नीच्या भूमिकेत असून यात पती अत्यंत कंजूष आणि पैसे खर्च करणे टाळणारा दाखविण्यात आला आहे.
एका विवाहात नवदांपत्याला टोस्टर गिफ्ट म्हणून देताना त्याची किंमत पाहून त्याला धक्का बसतो, परंतु अखेर तो हा टोस्टर खरेदी करतो आणि गिफ्ट म्हणून देतो देखील. यादरम्यान विवाहसोहळ्यात उपस्थित प्रत्येक पाहुण्याला राजकुमार टोस्टरची किंमत दरवेळी वाढवून सांगत असल्याचे टीजरमध्ये दिसून येते.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तर या चित्रपटात राजकुमार आणि सान्या सोबत अर्चना पूरन सिंह, अभिषेक बॅनर्जी, उपेंद्र लिमये हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर चित्रपटाची निर्मिती राजकुमार रावची पत्नी पत्रलेखाने केली आहे. सान्याचा ‘मिसेस’ हा चित्रपट अलिकडेच ओटीटीवर प्रदर्शित झाला असून यातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.